परभणी,(प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यात बंद पडलेली सीसीआय कापूस खरेदी केंद्र आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर सुरू झाले असून सिंगणापूर फाटा येथे अरिहंत कापूस जिनिंग येथे बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी आमदार पाटील यांच्या हस्ते सीसीआय कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
परभणीत सन 2012 पासून सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र जिल्ह्यातील काही नेत्यांमुळे बंद पडले होते, यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती, शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळत नव्हता, त्यामुळे आमदार डॉ. पाटील यांनी कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. भारतीय कपास निगम लिमिटेड सीसीआय चे व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता यांची मुंबईत भेट घेऊन सीसीआयचे केंद्र परभणीत सुरू करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली होती या मागणीला यश येऊन सिंगणापूर फाटा येथे हे केंद्र सुरू झाले आहे, बुधवारी या ठिकाणी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, कापूस खरेदी केंद्रात शेतकऱ्यांना कापसासाठी 7 हजार 500 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे,शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपला कापूस विक्रीस आणावा, परभणी जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र मोठे आहे हे आणखी वाढावे यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहोत कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची परभणीत उभारणी होणार आहे,एरंडेश्वर शिवारात येत्या तीन महिण्यात महिला सुतगिरणी सुरु होणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कापुस या सुतगिरणीसाठी योग्य भावाने खरेदी केला जाईल,सुतगिरणीच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार मिळणार आहे,तसेच इतर कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची उभारणी झाल्यास कापसाला चांगला भाव मिळेल त्यामुळे आपण यासाठी आगामी काळात पाठपुरावा करणार आहे असे यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंढरीनाथ घुले , कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अजय चव्हाण,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अरविंद काका देशमुख, संग्राम जामकर ,सोपानराव अवचार ,फैजूला पठाण, संजय तळणीकर , पांडुरंग खिल्लारे, जवंजाळ दाजी , आदींसह कापूस उत्पादक शेतकरी, कापूस जिनिंग मधील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


