परभणी,(प्रतिनिधी) : शहरात भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीची छेड काढणार्या त्या नराधमास कठोर शासन करावे, अशी मागणी शिवसेनेच्या महिला पदाधिकार्यांनी केली आहे.
शिवसेना महिला पदाधिकारी यांनी सोमवारी (दि.09) पोलीस अधीक्षकांना एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीची छेड काढण्याचा प्रकार नुकताच सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्याबाबत संबंधीत तरुणीमार्फत नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी त्या आरोपीस अटकही केली आहे. असे अनेक प्रकार शहरात वारंवार घडतांना दिसत आहेत. परंतु सगळ्याच तरूणी भितीपोटी पोलीसांकडे तक्रार न करता सहन करीत आहेत. या घटनेची दखल घेत पोलिसांनी त्या आरोपीस अटक केली आहे ही बाब उल्लेखनीयच आहे. परंतु, तेवढ्यावरच न थांबता अटक आरोपीस कठोर शासन करावे, तसेच त्याची शहरातील मुख्य रस्त्यावरुन धिंड काढावी जेणेकरून पुन्हा असे दुष्कृत्य करतांना कुणीही धजावणार नाही व अशा विकृत मानसिकतेला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत पोलिसांचे दामिनी पथक महाविद्यालय परिसरात किंवा बाजारपेठेत कुठेही सक्रीय नसल्यामुळे विकृत तरुणांना कुठलीही भिती राहिली नाही. त्यामुळे शहरातील दामिनी पथके सक्रीय करावेत, अशी मागणी केली आहे.
यावेळी शिवसेनेच्या मनपातील माजी विरोधी पक्षनेत्या सौ.अंबिका अनिल डहाळे यांच्या नेतृत्वाखाली सौ.दीपा बोरूळ, मंदा वाघमारे, संगिता परवाळे, सविता मठपती, कांचन राठोड, मीरा कपाळे, वैशाली खांडे, किर्ती चौधरी, स्वाती बेजगमवार, कौशल्या पालकर, अस्मिता जाधव, राणी वर्मा, अर्चना नेमाने, मनिषा संघई, संगिता चट्टे, छाया गवारे, मनिषा शिंदे, मधुबाला चपाटे आदी महिला पदाधिकारी उपस्थितीत होते.


