कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम स्थानिक तक्रार समिती
परभणी, ( प्रतिनिधी) : महिला व बाल विकास विभाग शासन निर्णयान्वये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत स्थानिक तक्रार समिती गठण करण्याबाबतची तरतूद आहे. या समितीचे पुनर्गठण करण्यासाठी नामनिर्देशनाने अध्यक्ष व दोन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी नामांकने मागविण्यात येत आहे.
अध्यक्ष पदासाठी सामाजिक कार्याचा 5 वर्षांचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या महिलांमधून नामनिर्देशनाने अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी तरतूद आहे.
सदस्य (दोन) या पदासाठी महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशा अशासकीय संघटना/ संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्तींमधून दोन सदस्य नामनिर्देशित करण्यात यावेत व त्यांच्यापैकी किमान एक सदस्य महिला असावी. परंतु, त्यापैकी किमान एका नामनिर्देशित सदस्याची पार्श्वभूमी प्राधान्याने कायद्याची असावी. तसेच त्यापैकी किमान एक नामनिर्देशित सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी.
या स्थानिक तक्रार समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीचा कालावधी तीन वर्षांपेक्षा अधिक नसेल. वृत्त प्रसिध्दीच्या दिनांकापासून 7 दिवसांच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, परभणी यांच्याकडे नामांकन सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी के.व्ही.तिडके यांनी केले आहे.
*-*-*-*-*


