परभणी, (प्रतिनिधी) ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमानिमित्त जिल्हा ग्रंथालय कार्यालयात दि. 30 व 31 डिसेंबर, 2024 रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 375 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दि. 1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत राबविला जाणार आहे.
यामध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कल्याण नगर, परभणी अंतर्गत आकाशकन्या प्रशाला परभणीच्या विद्यार्थ्यांची परभणी येथील गणेश वाचनालयास भेट व विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. तसेच पुर्णा येथील स्वा. सै. सुर्यभानजी पवार महाविद्यालय व स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दि. 1 ते 15 जानेवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत, वाचन पंधरवड्यानिमित्त सामूहिक वाचन, वाचन कौशल्य, कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहीम राबविली जाणार असून ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले आहे. परभणी शहरातील व पुर्णा शहरातील विद्यालये, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी, पालकांनी व वाचकप्रेमींनी उपक्रमात सहभागी होण्याची आवाहन गणेश वाचनालय परभणी, स्वा. सै. सुर्यभानजी पवार सार्वजनिक वाचनालय, पुर्णा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी परभणी यांनी केले आहे.
*-*-*-*-*


