परभणी (प्रतिनिधी) : सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यामध्ये आमदार डॉ.राहुल पाटील यांचा नेहमीच भर असतो. अशा कार्यक्रमांना मला आवर्जून जावे वाटते. कारण, केवळ लोकप्रतिनिधी म्हणून ते भूमिका पार पाडत नाहीत तर त्यांच्यातील डॉक्टर सुद्धा समाजात अमुलाग्र बदल घडावेत, यासाठी धडपडत असतो. इतरांचे दुःख, त्यांच्या अडीअडचणी सोडविताना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम आजपर्यंत आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केले आहे. ते लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर यांचा उत्तम संगम असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी व्यक्त केले.

परभणी मेडिकल कॉलेज यांच्या सहयोगाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (सीएसआर निधी) अंतर्गत (गेल इंडिया लिमिटेड व बीपीसीएल यांचा संयुक्त प्रकल्प) मध्ये भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मोफत दिव्यांग शिबिर घेण्यात आले. परभणी मेडिकल कॉलेज येथे रविवारी हे शिबिर झाले. यामध्ये दिव्यांगासाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर शिबीरामध्ये एकूण १५२ जणांना हे अवयव बसविण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार डॉ.राहुल पाटील, भारत विकास परिषद विकलांग केंद्र समन्वयक विनय खटावकर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आमिर तडवी, जयश्री खटावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी मोजमाप शिबिरात ३४७ दिव्यांगांनी नोंदणी केली होती. आज प्रत्यक्ष अवयव बसविण्याचे शिबिर झाले. १५२ जणांना कृत्रिम अवयव बसविण्यात आले.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, आज प्रत्येकाची उंची ही त्यांच्या संपत्तीच्या श्रीमंतीवरून ओळखली जाते. मात्र, यातही ज्यांना हात, पाय, डोळे असे सर्व अवयव असतात ते सर्वाधिक श्रीमंत. हीच खरी श्रीमंतीची ओळख आहे. आपल्यातील काही जणांना हात, पाय किंवा इतर अवयव यामुळे मागे राहावे लागू नये, त्यांनाही चालता यावे यासाठी धडपड करण्याचे प्रामाणिक प्रयत्न आमदार डॉ.राहुल पाटील यांच्याकडून नेहमीच केले जातात. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक जण आपल्या पायावर उभे राहिले आहेत. सामाजिक संस्था म्हणून सुद्धा भारत विकास परिषद विकलांग केंद्र यांनीही भरीव कार्य केले आहे. आज समाजात मदतीसाठी हात पसरणे ही एक अवघड गोष्ट आहे. अनेक ठिकाणी संपर्क साधून मदत मिळविणे आणि ती योग्य लोकांपर्यंत पोहोचविणे याचे काम विनय खटावकर, आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केले आहे.
आमदार डॉ.राहुल पाटील म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकासाठी काय करता येईल याचा केवळ विचारच नाही तर त्याची अंमलबजावणी आधी केली जाते. मतदारसंघात मोफत शिलाई मशीन वाटप योजना असो की मोतीबिंदूमुक्त मतदारसंघ गाव, जेष्ठ नागरिक जागृत मंच याशिवाय महिला बचत गट यातून प्रत्येक घटकाला समाजामध्ये विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. दिव्यांग बांधवांसाठी काहीतरी करण्याची इच्छा नेहमीच असते. भारत विकास परिषद विकलांग केंद्रच्या माध्यमाने या इच्छेला कृतीची जोड मिळाल्याने त्याचे समाधान आहे. चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी अजून भरीव काम करण्याचा संकल्प आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी नवनीत पाचपोर प्रकाश जाधव पुंजाराम बुंगे गुजर सर स्वप्निल बोर्डे सुभाष मोरे विलास राठोड ज्ञानेश्वर राठोड विष्णू वैरागड पी.ए.देशमुख रितेश लासे महेंद्र फुटाणे मकरंद कुलकर्णी राहुल गायकवाड अर्जुन राठोड संतोष पोटभरे कदम तसेच परभणी मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी, विविध पदाधिकारी, आदींनी परिश्रम घेतले.


