परभणी,(प्रतिनिधी) : स्व. अॅड. शेषराव धोंडजी भरोसे यांच्या स्मृतीनिमित्त पाचव्यांदा संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कृषी संजीवनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना नेते तथा संयोजक आनंद भरोसे यांनी दिली.
या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन समारंभास आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भरोसे यांनी शुक्रवारी (दि.24) आयोजित केलेल्या पत्रकार परिषद दिली. यावेळी बाळासाहेब पानपट्टे, सचिन पाटील यांची उपस्थिती होती.
कृषी संजीवनी महोत्सवात निरनिराळे 6 दालन उभारण्यात येणार आहेत. हे दालन अत्याधुनिक डोम पद्धतीचे भव्य जम्बो मंडप उभारले जाणार आहेत. तसेच प्री – फॅ ब्रिकेटेड स्टॉल्स उभारले जाणार आहेत. या प्रदर्शनात 200 हून अधिक कृषी उत्पादनाचे स्टॉल सहभागी होणार आहेत. तसेच या मंडपामध्ये कॉन्फरन्स हॉल देखील उभारण्यात येत असून त्यामध्ये शेतकरी बांधवाकरिता शेती विषयक चर्चासत्र व परिसंवाद, परभणी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकर्यांचा गौरव, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान, बी – बियाणे, सेंद्रीय शेती, पद्धती, गांडूळ खत निर्मिती, पशुखाद्य, ट्रॅक्टर, आधुनिक शेती अवजारे, रासायनिक खते, कृषी मार्गदर्शक पुस्तके, ठिंबक सिंचन, सोलार उत्पादने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू, धान्य महोत्सव असे अनेक स्टॉल्स लागणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असून परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कृषी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन संयोजक आनंद भरोसे व संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, 6 किलो वजनाचा कोंबडा, सर्वात बुटकी म्हैस, 30 किलोचा चिनी बोकड हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार असून माफक दरात शेतकरी व नागरिकांसाठी हेलिकॉप्टरची 7 मिनिटांची सैर आयोजित केली आहे, अशीही माहिती भरोसे यांनी दिली.


