परभणी (प्रतिनिधी) :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटल येथे मोफत बालरोग व टूडी इको तपासणी शिबिरात 438 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 97 बालकांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे तपासणी अंती आढळून आले.
परभणी जिल्ह्यासह शेजारच्या हिंगोली, जालना, बीड जिल्ह्यातून अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन आर.पी. हॉस्पिटल येथे आले होते. दिवसभरात 438 बालकांची तपासणी करण्यात आली.सायंकाळपर्यंत या बालकांची तपासणी सुरु होती. यामधून 97 बालकांवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी परभणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमीर तडवी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रावजी सोनवणे,
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम, मुंबई येथील सुप्रसिद्ध बाल हृदयरोग तज्ञ डॉ. भूषण चव्हाण, आरोग्य विभाग प्रमुख राहुल कांबळे डॉ.कुणाल कौसडीकर,डॉ.अनिल कानडे,डॉ.वसीम सिद्धकी,डॉ.श्रीधर मोरे, तसेच आर.पी हॉस्पिटल येथील बाल रोगतज्ञ डॉ.बाबा साहेब गायकवाड , मेडिसिन डिपार्टमेंटचे डॉ.शहाजी बोडखे, स्त्रीरोगतज्ञ डॉ.भीमराव कनकुटे, अस्तिरोग तज्ञ डॉ.नीरज तापडया, कान नाक घसा तज्ञ डॉ.फैज, मीनाक्षी पदमे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले, हृदय रोगाशी सबंधित ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची २ डी इको व हृदयरोग तपासणीचे मोफत आरोग्य शिबिर होत असून यामधील सदोष व गंभीर आजारग्रस्त बालकांवर या पुढे आर.पी हॉस्पिटल येथे नामवंत हृदयरोग तज्ञांकडून उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे मतदारसंघातील कोणीही गरजवंत रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही. यासाठी आर.पी हॉस्पिटल हे आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील बोर्डे यांनी केले. आभार डॉ.अमीर तडवी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल गायकवाड, पंकज गंगवाल,शिवाजी जाधव ,आकाश भालेराव, आदींनी पुढाकार घेतला.


