गंगाखेड,(प्रतिनिधी) : येथील महर्षी याज्ञवल्क्य वेद विद्यालय, यज्ञभूमी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त पारंपरिक, धार्मिक व आध्यात्मिक विधींचा भव्य सोहळा आज गुरुवार 10 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या पाच हजारांहून अधिक शिष्यांनी सहभाग नोंदवला.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी या सोहळ्याचे उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले गवामयन सत्र. या सत्रात श्रुती-पाठ, वेदघोष आणि धर्मशास्त्रावर आधारित मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, सोमयागी पूज्य रंगनाथ दीक्षित सेलुकर महाराज यांच्या समाधीस्थळी अभिषेक व विशेष वेदविधी पार पडले. यानंतर यज्ञेश्वरजी सेलुकर महाराज यांच्या पाद्यपूजनाचा व पालखी मिरवणुकीचा सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला. संपूर्ण यज्ञभूमी परिसर वेदमंत्र, घोषवाक्ये व भक्तांच्या जयघोषांनी दुमदुमला. गुरुपूजन, वेदपाठ, कीर्तन, प्रवचन या सर्व कार्यक्रमांतून यज्ञभूमी परिसर भक्तिरसात न्हालेला होता. परंपरा, श्रद्धा आणि वेदविद्येचा संगम अनुभवण्यासाठी आलेल्या शिष्य व भक्तांनी यावेळी गहन आध्यात्मिक समाधान मिळाल्याची भावना व्यक्त केली.


