परभणी,(प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील संबर येथील ओंकार बन्सीधर गायकवाड यांच्या अपहरण व खून प्रकरणाचा परभणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत पाच आरोपींना अटक केली आहे.
12 जुलै 2025 रोजी रात्री संबर येथील ओंकार गायकवाड यांचे अपहरण करण्यात आले. याबाबत परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 309/2025 अंतर्गत भा.दं.वि. कलम 140 (3), 351 (2)(3)(5), 103 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसर्या दिवशी, म्हणजे 13 जुलै रोजी सकाळी मोरेगाव शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला. या अपहरत तरुणाचा खून करुन आरोपींनी पोबारा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी तात्काळ बैठकी घेऊन गुन्ह्याचा तपास गतीने करण्याचे आदेश दिले. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे संयुक्त पथके तयार करुन रवाना करण्यात आली.
ग्रामीणच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशेष सापळा रचून भिमा उर्फ भिमाशंकर शामराव वैद्य ( वय 21 वर्षे, रा. बोबडे टाकळी), वैभव दिनकर खेडकर (वय 23 वर्षे, रा.शिराळा ता. सेलू) व माणिक उर्फ नितीन जिजा काळे उर्फ सदावर्ते ( वय 22 वर्षे, बोबडे टाकळी) या तिघांना ताब्यात घेतले. तर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने हरीओम प्रभाकर मोहीते (वय 22 वर्षे, रा. खानापूर) व वेदांत मुंजाजी पारवे ( वय 19 वर्षे, रा. खानापूर) अशा एकूण पाच आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, या संपूर्ण कारवाईत पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, सपोनि राजू मुत्येपोड, पोउपनि चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार मधूकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शरद सावंत, सिद्धेश्वर शिवणकर (स्थागुशा) तसेच पो.नि. श्रीकांत डोंगरे, पोउपनि संदीप गडदे, पो.अं. शंकर जाधव, देविदास डुकरे (परभणी ग्रामीण पो.स्टे) आणि सायबर पोलीस स्टेशनचे बालाजी रेड्डी, रजवी मुर्तिजा, सय्यद हिना, गणेश कौटकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.