परभणी, (प्रतिनिधी) राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमातंर्गत अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमोवशक सुधारीत धोरणानुसार परभणी जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर गट ‘क’ संवर्गात 43, गट ‘ड’ संवर्गात 47 उमदेवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एम.पी.एस.सी.) शिफारस केलेले 23 उमेदवार असे एकूण 113 उमेदवारांना शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. शनिवार, 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात या उमेदवारांना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी व पत्रकार उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रसारण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांचे मुख्य कार्यक्रमातील भाषण समाप्त झाल्यानंतर जिल्हास्तरावर उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यातील 113 उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरीत करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.
सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दि. 17 जुलै, 2025 अन्वये अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी सुधारीत धोरण या शासन निर्णयानुसार या पुढे गट क संवर्गाची सुधारीत अनुकंपा प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्तरावर ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. उपरोक्त शासन निर्णयातील तरतूदी नुसार सुधारीत अनुकंपा यादी व रिक्त पदांचा तपशील जिल्ह्याचे संकेतस्थळ www.parbhani.nic.in वर प्रसिध्द करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यात विविध विभागात अनुकंपा अंतर्गत गट क पदासाठी 43, गट ड पदासाठी 47 आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी.) 23 उमेदवारांची नियुक्ती केली आहे.
तरी परभणी जिल्ह्यातील अनुकंपा धर्तीवर निवड झालेल्या विविध विभागातील उमेदवारांनी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपीक-टंकलेखक या पदासाठी परभणी जिल्ह्यासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांनी त्यांचे नियुक्ती पत्र हस्तगत करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वा.उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
*-*-*-*-*


