परभणी, (प्रतिनिधी) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय परभणी यांच्या वतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अनुदान, बीज भांडवल व थेट कर्ज योजनांअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
महामंडळाच्या मुख्यालयाकडून परभणी जिल्ह्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत १५, बीज भांडवल योजनेअंतर्गत १५ आणि थेट कर्ज योजनेअंतर्गत ३० अशा एकूण ६० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
इच्छुक अर्जदारांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://mahadisha.mpbcdc.in येथे ऑनलाइन अर्ज सादर करावेत तसेच जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, व्यवसाय जागेचा पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, राहत्या घराचा पुरावा तसेच शॉप अॅक्ट परवाना किंवा उद्यम आधार आदी कागदपत्रांच्या दोन प्रती जिल्हा कार्यालयात सादर कराव्या लागतील.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक डी.एस.गायकवाड यांनी केले आहे.
***


