परभणी, (प्रतिनिधी) : नवी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनातुन संसदेवर काढलेल्या मोर्चा दरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदच्या आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला.
बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीने सकाळी शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. व्यापारी, प्रतिष्ठानचालक आणि दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्या आवाहनास व्यापार्यांनी जोरदार प्रतिसाद दिला व व्यापारीपेठा बंद ठेवल्या. तसेच विविध शैक्षणिक संस्थांनीसुध्दा शाळा बंद ठेऊन या आंदोलनास प्रतिसाद दिला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परभणी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. प्रमुख चौक, महत्त्वाचे रस्ते तसेच शासकीय आणि सार्वजनिक कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.

मानवतला कडकडीत बंद व मोर्चा…
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व पक्ष व संघटनांच्या सहकार्याने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला गुरुवारी (दि. 23) मानवत शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी नायब तहसीलदार सौ. अंभोरे यांना निवेदन देण्यात आले. जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात तसेच विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे परभणी उपजिल्हाध्यक्ष नंदकिशोर कुमावत यांच्यासह आनंद भदर्गे, राजूभैय्या खारत, प्रभाकर कदम, गोविंदा घाडगे, दीपक ठेंगे, व्यंकटराव चौधरी, धम्मपाल सोनटक्के, संपत पंडित, शेख मुस्ताक, आशेफ खान, मोहन बारहाते, महेंद्र ठेंगे, चंद्रकांत मगर, रवि पंडित, फकिरा सोनवणे, खयूम बागवान, महबूब मनसुरी, सय्यद समीर खान, इलियास पठाण आणि राजेभाऊ होगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
जिंतूरात बंदला प्रतिसाद….
जिंतूर शहरात गुरुवारी (दि. 23) संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांच्या नावे निवेदन देण्यात आले. निवेदनात जंतरमंतर येथे आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी तसेच विद्यार्थी आंदोलनांदरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. हे निवेदन युवा जिल्हा महासचिव सतीश वाकळे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी इस्माईल पहेलवान, सय्यद फेरोज, अनिल गाडेकर, नगरसेवक अकबर कुरेशी, मास भाई, वसीम पठाण, रहीम पहेलवान, मकसूद पठाण, रियाज भाई, जुनेद भाई, धम्मपाल, वकील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे गंगाधर घुगे, शरद चव्हाण, गणेश गुलाबराव काकडे यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


