परभणी, (प्रतिनिधी)– भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीस महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
बैठकीत स्वातंत्र्यदिन समारंभाचे नियोजन, ध्वजारोहण स्थळावरील आवश्यक सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वच्छता, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा तसेच विविध विभागांमधील समन्वय आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
समारंभ शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी महानगरपालिका, पोलीस विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करून समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
१४ ऑगस्ट २०२६ रोजी देशभर ‘फाळणी स्मरण दिवस’ पाळण्यात येणार आहे. फाळणीच्या वेदनादायी इतिहासाची जाणीव विशेषतः तरुण पिढीला करून देणे तसेच प्रभावित झालेल्या लाखो नागरिकांच्या त्याग आणि जिद्दीला अभिवादन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
तसेच दि. 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाचाही आढावा घेण्यात आला. यंदाचा उपक्रम ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ समर्पित असून, विविध जनजागृती कार्यक्रमांसह वंदे मातरम गायनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग वाढविण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या अनुषंगाने बाईक रॅली, विविध स्पर्धा, जनजागृती कार्यक्रम, प्रभात फेऱ्या तसेच राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करणारे विविध उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय समारंभ तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बैठकीत दिले.
***


