परभणी, (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी जिंतूर येथील परभणी रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे सकाळी ९.०० वाजता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात १८ ते ७० वर्षे वयोगटातील पात्र नागरिकांची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत नोंदणी करण्यात येणार असून, रुपये २ लाखांचा अपघाती विमा संरक्षण पुर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा विमा महसूल विभागाच्या पुढाकाराने काढण्यात येणार आहे.
या विशेष शिबिराचा लाभ जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी घ्यावा, तसेच संबंधित बँकांचे सर्व खातेदार आणि १८ ते ७० वर्षे वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.
शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आधार कार्ड तसेच बँक पासबुकची झेरॉक्स प्रत ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. या शिबिरात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), महाराष्ट्र ग्रामीण बँक (MGB) आणि पीडीसीसी बँक (PDCC) या बँकांमध्ये खाते असलेल्या पात्र खातेदारांची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना असून, अपघाती मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण मिळते. या शिबिराच्या माध्यमातून पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. “आपली सुरक्षा – आपल्या कुटुंबाचे संरक्षण. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अवश्य लाभ घ्या,”
***


