परभणी,(प्रतिनिधी) : राष्ट्रभक्ती ही केवळ घोषणांमध्ये नसून ती आपल्या शिस्तबद्ध आचरणात, जबाबदारीत आणि कर्तव्यपालनात दिसली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केले.
नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूलच्या शिवाजीनगर शाखेत सोमवार 27 जूलै रोजी कारगिल विजय दिन राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याच वेळी विद्यार्थी संसदेचे उद्घाटन व शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. कारगिल युद्धातील शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजयराव जोशी होते. प्रमुख पाहुणे व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष अनिल अष्टूरकर, सहसचिव तथा मुख्याध्यापक-प्राचार्य अनंत पांडे, कोषाध्यक्ष श्रीनिवास मुंदडा, संचालक व्यंकटेश तोरंबेकर, पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील, सहाय्यक पर्यवेक्षक सुनील रामपूरकर, तसेच विद्यार्थी संसदेचे सल्लागार श्रीपाद कुलकर्णी, शिवप्रसाद कोरे आणि अभिजीत कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर संगीत विभागप्रमुख विशाल धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आझाद हिंद सेनेच्या प्रेरणादायी गीताने वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले.
प्रास्ताविकात प्राचार्य अनंत पांडे यांनी कारगिल विजय दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना 1999 मधील कारगिल युद्धात भारतीय सैन्याने दाखविलेल्या अद्वितीय शौर्य, धैर्य आणि बलिदानाची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, लोकशाही मूल्ये, जबाबदारीची भावना आणि राष्ट्रभक्ती रुजावी या उद्देशाने गेल्या 26 वर्षांपासून मराठवाडा हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिन आणि विद्यार्थी संसदेचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारगिलमधील शहीद जवानांना भावपूर्ण मानवंदना अर्पण करण्यात आली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमावत यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रहित सर्वोच्च मानण्याचा संदेश दिला. कारगिल युद्धाचा इतिहास उलगडताना त्यांनी भारतीय सैनिकांनी बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या शौर्यपूर्ण लढ्याचा उल्लेख केला. कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज पांडे आणि ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांसारख्या वीर जवानांच्या पराक्रमाचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांना देशासाठी समर्पण, धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली. भारत हा शांततेचा पुरस्कार करणारा देश आहे. आम्ही कोणालाही छेडत नाही; मात्र कोणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची ताकद भारतीय सैन्याकडे आहे. राष्ट्रभक्ती ही केवळ घोषणांमध्ये नसून ती आपल्या शिस्तबद्ध आचरणात, जबाबदारीत आणि कर्तव्यपालनात दिसली पाहिजे. विद्यार्थी संसदेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, लोकशाही मूल्ये आणि जबाबदारीची जाणीव विकसित होते. अशा उपक्रमांतूनच जबाबदार, शिस्तप्रिय आणि राष्ट्राभिमानी नागरिक घडतील, असे प्रतिपादन कुमावत यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवप्रसाद कोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीपाद कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी संसद प्रतिनिधी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रभक्ती, लोकशाही मूल्ये आणि नेतृत्व विकासाचा संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाची सांगता सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनाने झाली.
विद्यार्थी संसदेचा शपथविधी सोहळा संपन्न…
या कार्यक्रमात विद्यार्थी संसदेचा शपथविधी सोहळा पार पडला. विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षा समीक्षा प्रमोद ढेंबरे यांना जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी संस्कृत भाषेत शपथ दिली. उपाध्यक्षा सायली देशमुख यांनी मराठीत, सचिव प्रांजल सूर्यवंशी यांनी इंग्रजीत, तर सहसचिव आंचल राठी यांनी हिंदीत शपथ घेतली. विद्यार्थी प्रतिनिधी जय तारे यांनी मराठीत आणि अनुष्का जगताप यांनी इंग्रजी भाषेत शपथ ग्रहण केली. बहुभाषिक शपथविधीमुळे भारतीय भाषांचा गौरव आणि लोकशाही मूल्यांप्रती विद्यार्थ्यांची बांधिलकी अधोरेखित झाली.
स्वयंशिस्त ही यशाची गुरुकिल्ली – विजय जोशी…
अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष विजयराव जोशी यांनी कारगिल विजय दिन हा भारतीय सैनिकांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव करणारा दिवस असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त, परिश्रम, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्ती या मूल्यांचा स्वीकार केल्यास राष्ट्र अधिक सक्षम आणि बलशाली बनेल, असे ते म्हणाले. स्वयंशिस्त ही यशाची गुरुकिल्ली असून विद्यार्थी संसद हे विद्यार्थ्यांना जबाबदार, कर्तव्यदक्ष आणि आदर्श नागरिक घडविणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.


