गंगाखेड (प्रतिनिधी) पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य व पाल्यांच्या शैक्षणिक बाबीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे अभिवचन डॉक्टर असोशिएशन व लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊनचे अध्यक्ष लॉ. डॉ. के.पी. गारोळे यांनी शनिवार २५ जुलै रोजी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात बोलतांना दिले.
गंगाखेड शहरातील प्रसिद्ध सर्जन तथा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. के.पी. गारोळे यांची लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊनच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया गंगाखेड शाखेच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून शनिवार २५ जुलै रोजी विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना लॉ. डॉ. के.पी. गारोळे म्हणाले की व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयाच्या आरोग्यविषयक समस्या तसेच त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर व कटिबद्ध राहु तसेच आगामी काळात लवकरच पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून त्यांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न करू असे अभिवचन देत त्यांच्या मुला मुलींच्या शैक्षणिक अडचणीतही कायम पत्रकारांसोबत सोबत राहु अशी ग्वाही सत्काराला उत्तर देतांना डॉ. गारोळे यांनी दिली. पुढे बोलतांना ते म्हणाले की वैद्यकीय सेवेकडे मी कधी ही व्यवसाय म्हणून पाहिले नसल्यामुळे पत्रकारांकडून माझा सन्मान होतो हे माझ्या आजवरच्या कामाचे संचित असल्याचे मानतो असे नमूद करत पत्रकार संघाने माझा सत्कार केला त्यामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. कुठलेही पद शोभेसाठी नसून ते समाजाच्या कामी आलं पाहिजे असे मानणारा मी असल्याने पत्रकारांच्या आशा अपेक्षांना कधी तडा जाऊ देणार नाही असे सांगितले. यावेळी जेष्ठ पत्रकार दगडू सोमाणी, व्हॉईस ऑफ मीडियाचे गंगाखेड तालुकाध्यक्ष अन्वर शेख लिंबेकर, गुणवंत कांबळे, अली चाऊस, शिवाजी कांबळे, भागवत जलाले, बालासाहेब जंगले, अंकुश कांबळे, भीमराव कांबळे, बालासाहेब कदम, सिद्धोधन हत्तीअंबीरे, उत्तम काळे, राजू लांडगे, प्रभू राठोड, मकरंद चिनके, उत्तम दसवंते, अशोक व्हावळे, उद्धव चाटे आदींसह बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.


