परभणी,(प्रतिनिधी) : विश्व हिंदू परिषद, परभणी यांच्या वतीने गेल्या 48 वर्षांपासून अखंडपणे आयोजित करण्यात येणार्या पारंपरिक भव्य गोपाळ दिंडीला यंदाही विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूलसह शहरातील विविध शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी या दिंडीत सहभाग नोंदवत भक्ती, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा अनोखा संदेश दिला.
यंदाच्या गोपाळ दिंडीच्या पूजेचा मान माळी गल्ली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भाविक तथा प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजू सुरवसे व सौ. स्मिता सुरवसे यांना मिळाला. या ठिकाणाहूनच टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. अरविंदो अक्षर ज्योती विद्यालयाच्या लेझीम पथकाने केलेले आकर्षक सादरीकरण आणि वारकरी वेशभूषेतील बालगोपाळांनी साकारलेली भक्तिमय दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. एन.व्ही.एस. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी साकारलेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कुटुंबाचा देखावा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या दिंडीत वसंतराव नाईक विद्यालय, अरविंदो अक्षर ज्योती विद्यालय, मराठवाडा हायस्कूल, खंडोबा बाजार विद्यालय, जनकल्याण विद्यामंदिर, उद्देश्वर विद्यालय तसेच शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माळी गल्ली येथून प्रारंभ झालेली ही भव्य गोपाळ दिंडी विद्यानगर येथील जनकल्याण पतसंस्था परिसरात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
यावेळी नूतन विद्या समितीचे उपाध्यक्ष अनिलराव अष्टुरकर, सचिव संतोषराव धारासुरकर, मुख्याध्यापक तथा विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र क्षेत्र सहमंत्री अनंत लक्ष्मीकांत पांडे, व्यंकटेश तोरंबेकर, उपमुख्याध्यापक बाळकृष्ण कापरे, प्राथमिक मुख्याध्यापिका स्मिताताई ढगे, अरविंदो अक्षर ज्योती विद्यालयाच्या संचालिका अय्यर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, शहराध्यक्ष अशोकराव राका, जिल्हामंत्री राजकुमार भामरे, जिल्हा सहमंत्री मनोज काबरा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह अभिजित अष्टुरकर, सूर्यकांत पाटील, सुनील रामपूरकर, शिवप्रसाद कोरे, गोपाळ रोडे, अभिजित कुलकर्णी, गणेश काळबांडे, विनोद लोलगे, प्रसाद कुलकर्णी, श्यामसुंदर शहाणे, गजानन नलगे, श्रीपाद कुलकर्णी, मनीष देशपांडे, रितेश जैन, बबलू टाक, बिट्टू गव्हाणे, विश्वंभर पाचपोर, मोहन कुलकर्णी, पर्यवेक्षक शिवाजी आरळकर, वसंत पुरी, शिवराम कटारे आदींसह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

ठिकठिकाणी फराळ व प्रसादाचे वाटप…
दिंडी मार्गावर विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि मित्र मंडळांनी बालगोपाळांचे उत्साहात स्वागत केले. डॉ. केदार खटिंग यांच्या वतीने केळीचा प्रसाद, भगवान भोजवाणी यांच्या वतीने चॉकलेटचे वाटप करण्यात आले. तसेच विविध मित्र मंडळे, व्यापारी संघटना, लॉयन्स क्लब, विद्यानगर मित्र मंडळ, लक्ष्मीनगर मित्र मंडळ आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने फराळ व प्रसादाचे वितरण करण्यात आले.
‘गोपाळ दिंडी ही बालसंस्कारांची चालती-बोलती शाळा’ – अनंत पांडे
गेल्या 48 वर्षांपासून सुरू असलेली ही गोपाळ दिंडी केवळ मिरवणूक नसून बालसंस्कारांची चालती-बोलती शाळा आहे असे प्रतिक्रिया यावेळी विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र क्षेत्र सहमंत्री तथा मराठवाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक अनंत लक्ष्मीकांत पांडे यांनी व्यक्त केली. वारकरी संप्रदायातील भक्ती, शिस्त, समता, सेवा, त्याग आणि राष्ट्रभक्तीची मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचे कार्य या दिंडीद्वारे केले जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय संस्कृतीची मुळे अधिक भक्कम करण्याचे काम ही दिंडी करत आहे, असे पांडे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संतांच्या विचारांचे अनुकरण करून आदर्श, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.


