परभणी,(प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने बालगोपाळांमध्ये वारकरी परंपरेचे संस्कार रुजविण्यासाठी विश्व हिंदू परिषद, परभणीच्या वतीने गेल्या 48 वर्षांपासून आयोजित करण्यात येणारी भव्य गोपाळ दिंडी यंदाही उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. शनिवार 25 जुलै रोजी सकाळी 8 वाजता माळी वेस येथील हनुमान मंदिरातून दिंडीला प्रारंभ होणार असून शहरातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरची वारी करतात. त्याच परंपरेचा संस्कार बालकांवर व्हावा, या उद्देशाने परभणीत ‘प्रति पंढरपूर’ उभारण्याचा उपक्रम विश्व हिंदू परिषद गेल्या चार दशकांहून अधिक काळ सातत्याने राबवत आहे. या दिंडीत संत परंपरा, वारकरी संस्कृती, भक्तीभाव आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडते. यंदाच्या दिंडीत संत मेळा, चलचित्र, पावली वारकरी, टाळ-मृदंग, अभंगगायन तसेच पारंपरिक वेशभूषा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिंडीचा मार्ग माळी वेस येथील हनुमान मंदिर, नारायण चाळ, स्टेशन रोड, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नाना पेठ, विद्यानगर मार्गे माऊली मंदिर असा राहणार असून तेथे दिंडीचा समारोप होईल. प्रारंभी यजमानांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात येणार आहे.
यावर्षीच्या दिंडीचे विशेष आकर्षण म्हणून डॉ. संजय टाकळकर यांच्याकडून पंढरपूरच्या धर्तीवर अश्वारोहण आणि रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. दिंडीत सहभागी होणार्या बालगोपाळांसाठी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, व्यापारी असोसिएशन, सराफा असोसिएशन, लायन्स क्लब तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने प्रसाद व फराळाचे वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, जिल्हामंत्री राजकुमार भामरे, जिल्हा सहमंत्री मनोज काबरा, शहराध्यक्ष अशोक जैन (राका) तसेच मराठवाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक व विश्व हिंदू परिषद क्षेत्रमंत्री अनंत पांडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 48 वर्षांची ही वैभवशाली परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी शहरातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुनील रामपूरकर, शिवप्रसाद कोरे, गोपाळ रोडे, अभिजित कुलकर्णी आणि विनोद लोलगे यांनी केले आहे.
Tuesday, September 15
ताज्या बातम्या:
- शुभम मस्केची सुरेल भरारी; ‘सा रे ग म प’मध्ये परभणीच्या युवा गायकाची टॉप-१२ मध्ये धडक
- कै. प्रा. शंकर गंधम सर स्मृती राज्य रस्सीखेच स्पर्धा उत्साहात संपन्न; लातूर, ठाणे, बुलढाणा व मुंबई ,नांदेड़ जिल्हा अव्वल स्थानी
- डॉ. संदीप चव्हाण यांची ग्राहक संरक्षण परिषदेत अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती
- जी-1 हॉस्पिटल येथे दि 29 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत
- वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्रात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
- आनंदराव भरोसे यांच्या हस्ते शेतकरी मेळाव्याच्या सभामंडपाचे भूमिपूजन
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर


