परभणी,द(प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने विजयादशमीच्या दिवशी आयोजित केलेल्या महादौडमध्ये हजारो युवक-युवती सहभागी झाले होते.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण दहा दिवस महानगराच्या विविध भागांमधून दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यास जोरदार प्रतिसाद मिळाला. त्या निमित्ताने महानगरात संपूर्ण देवीच्या नामाचा जागर करण्यात आला. या दुर्गामाता दौडचे नागरीकांनी ठिकठिकाणी उत्स्फुर्त असे स्वागत केले. माता भगिनींनी रांगोळी, सडा टाकीत व औक्षण करीत तसेच परमपवित्र भगव्या ध्वजाचे स्वागत केले. नऊ दिवसांपासून निघणार्या या दुर्गामाता दौडचा समारोप विजयादशमीच्या दिवशी महादौडच्या निमित्ताने करण्यात आला. पंचक्रोषितील हजारो युवक-युवती मंगळवारी विजयादशमीच्या दिवशी सकाळी 7 वाजता मध्यवस्तीतील श्री अष्टभूजा देवी मंदिर चौकात एकत्र आले होते. तेथून भगव्या ध्वज घेऊन भारतमातेचा तसेच देवी-देवतांच्या जयघोषात निघालेल्या या महादौडमध्ये हजारो युवक-युवती व नागरीक सहभागी झाले होते. प्रचंड जल्लोषात निघालेल्या या महादौडने संपूर्ण परभणीकरांचे लक्ष वेधून घेतले.


