परभणी ,(प्रतिनिधी) : तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मानवतावादी विचारांचा प्रसार आणि बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराला चालना देण्याच्या उद्देशाने आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 18 ऑक्टोंबर रोजी आयोजित धम्मसोहळ्याच्या सभामंडपाचे भूमिपूजन शुक्रवार 16 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. मांडाखळी-उमरी परिसरातील नियोजित बुद्ध विहाराच्या दहा एकर जागेत हा कार्यक्रम पार पडला.
आश्रय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा महाउपासक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पुढाकारातून या परिसरात भव्य सुवर्ण बुद्ध विहार उभारण्याचे काम सुरू आहे. बुद्धांचे करुणा, मैत्री, समता आणि बंधुतेचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी येथे विविध धार्मिक व धम्मविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून सभामंडपाचे भूमिपूजन पूज्य भंते मोगलायन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी त्यांनी उपासक-उपासिकांना त्रिशरण व पंचशील प्रदान केले. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भीमराव खाडे, डॉ. बी. टी. धुतमल, प्रा. तुकाराम साठे, आशिष वाकोडे, समाजकल्याण सभापती प्रा. डॉ. राजेश रणखांब, नगरसेवक विकास राजापूर, राहुल साळवे आणि आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
18 ऑक्टोबरला भव्य धम्मसोहळा…
रविवार 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता या ठिकाणी धम्मसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कठीण चिवरदान, बुद्धमूर्ती वाटप, धम्मदेशना आणि थायलंड येथील भिक्खू संघाच्या वतीने पवित्र परित्राण पाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. विविध देशांतील विद्वान बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत धम्मदेशना होणार असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मांडाखळी, उमरी आणि परिसरातील उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल धाडावे, मकरंद बानेगावकर, अजय रसाळ, अक्षय जगताप, बुद्धभूषण हत्तीअंबिरे, अजय वाघमारे, पंढरीनाथ गायकवाड, डी. के. कांबळे, दत्तराव मस्के, महादेव सोनटक्के, प्रदीप सांगडे, किरण झोडपे, मोगलायन घुगे, आकाश लाटे, बाळासाहेब कांबळे, आत्माराम मस्के यांच्यासह परिसरातील उपासक-उपासिका परिश्रम घेत आहेत.


