परभणी (प्रतिनिधी) अकरा दिवस घरोघरी विराजमान असलेल्या बाप्पांना आज निरोप देण्यात येणार आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी परभणी महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील कृत्रिम तलावाची तयारी पूर्ण झाली असून याच ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी गुरुवारी तलाव परिसराची पाहणी करून विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला.
महानगरपालिकेने 2017 मध्ये जलशुद्धीकरण केंद्र परिसरात 21 फूट खोल कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. तेव्हापासून शहरातील गणेशमूर्तींचे विसर्जन याच तलावात केले जाते. यंदाही शहरातील विविध भागांतून गणेशमूर्ती संकलित करून त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्तींसाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली असून, क्रेनच्या साहाय्याने मोठ्या मूर्तींचे सुरक्षितपणे विसर्जन केले जाणार आहे.
विसर्जनस्थळी महापालिकेच्या विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली असून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. विसर्जनाच्या दिवशी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कार्यरत राहणार आहेत. गुरुवारी झालेल्या पाहणीवेळी आयुक्त नितीन नार्वेकर, पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, उपायुक्त तुकाराम कदम, पाणीपुरवठा विभागप्रमुख तन्वीर मिर्झा बेग, अभियंता मो. इस्माईल, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुर्हा, मनोज खानापुरे, अग्निशमन विभागप्रमुख दीपक कानोडे, पोलिस निरीक्षक विश्वजित कासले आदी उपस्थित होते.
18 मूर्ती संकलन केंद्रे; 20 वाहने तैनात…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतर्फे शहरात गणेशमूर्ती संकलनासाठी 18 ठिकाणी केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. याबाबत आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या उपस्थितीत मनपा कार्यालयात बैठक घेण्यात आली. विसर्जनाच्या दिवशी गणेशमूर्ती संकलनासाठी 20 वाहने उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, निर्माल्य संकलन व विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याचे टँकर, विद्युत व्यवस्था आणि अग्निशमन दलाची वाहने सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभाग समिती ‘अ’ अंतर्गत गणपती चौक जिंतूर रोड, विसावा कॉर्नर, बालविद्या मंदिर मुख्य शाखा, नानलपेठ, शारदा महाविद्यालय, सहकार नगर पाटी, मारोती मंदिर, अपना कॉर्नर, मोठा मारोती देशमुख गल्ली आणि मल्हार नगर येथे संकलन केंद्रे राहणार आहेत. प्रभाग समिती ‘ब’ अंतर्गत गांधी पार्क, माळी गल्ली विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मोठा मारुती मंदिरासमोरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, बालाजीनगर मारुती मंदिर, म्युनिसिपल कॉलनी-बँक कॉलनी दर्गा रोड, म्युनिसिपल कॉलनी सभागृह आणि पांडुरंगनगर येथील सोमेश्वर महादेव मंदिर येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तर प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत खंडोबा बाजार, खंडेराया मंदिर, देशमुख हॉटेल समाधान कमान, शिवशक्ती बिल्डिंग, उघडा महादेव मंदिर, प्रभाग क्रमांक 6 मधील मारोती मंदिर, संभाजीनगर, प्रभाग क्रमांक 15 मधील विष्णुनगर, महादेव मंदिर, रामकृष्णनगर, नवश्या मारुती मंदिर, जागृती कॉलनी, हनुमान मंदिर तसेच खानापूर गावठाण येथील हनुमान मंदिर येथे मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 4 व 5 साठी फिरत्या वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
राहाटी बंधार्यात विसर्जन टाळा…
यंदा दुष्काळी परिस्थिती असून पूर्णा नदीपात्रातील पाणीसाठा कमी आहे. तसेच येलदरी धरणातील पाणीसाठाही मर्यादित असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी राहाटी बंधार्यात गणेशमूर्तींचे विसर्जन न करता महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावाचा वापर करावा, असे आवाहन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केले


