परभणी, (प्रतिनिधी) स्वच्छ भारत मिशन (नागरी) अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-2026 च्या अनुषंगाने पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महापालिका व जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींना स्वच्छतेसंदर्भातील सर्व निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
शहरांमध्ये दृश्यमान स्वच्छता, घराघरातून शंभर टक्के कचरा संकलन, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित देखभाल, प्लास्टिक निर्मूलन, जनजागृती, नागरिकांचा सहभाग आणि दैनंदिन प्रगतीचा आढावा या बाबींवर विशेष भर देत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने नियोजनबद्ध व परिणामकारक कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वच्छ सर्वेक्षण-2026 मध्ये परभणी जिल्ह्याला उत्कृष्ट स्थान मिळवून देण्यासाठी महापालिका व सर्व नगरपरिषद, नगरपंचायती, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे सहभाग नोंदवून स्वच्छतेच्या सर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गुरुवारी (ता. २३) दूरदृश्यप्रणालीद्वारे महापालिका, जिल्ह्यातील सर्व पालिकांच्या स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेतला. मुख्य निर्देश पुढीलप्रमाणे देण्यात आले.
दृश्यमान स्वच्छता – शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालय परिसर आणि पर्यटनस्थळे कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावीत. रस्त्यांवर कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच उघडे कचरा डेपो व कचऱ्याचे ढिगारे तात्काळ हटवावेत.
घराघरातून कचरा संकलन – शंभर टक्के घरांमधून दररोज ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करावा. व्यापारी आस्थापनांकडूनही नियमित कचरा संकलनाची व्यवस्था सुनिश्चित करावी.
सार्वजनिक स्वच्छतागृहे – सर्व सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृहे स्वच्छ, कार्यरत आणि वापरण्यायोग्य ठेवण्याबरोबरच पाणी, वीज, स्वच्छता साहित्य व नियमित देखभाल उपलब्ध ठेवावी.
घनकचरा व्यवस्थापन – ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करावी. कचऱ्याची उघड्यावर जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. जुन्या कचरा डेपोचे निर्मूलन व पुनर्विकासाची कार्यवाही गतीने पूर्ण करावी.
जनजागृती उपक्रम – नागरिक, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये, व्यापारी संघटना व महिला बचत गट यांच्या सहभागातून व्यापक जनजागृती राबवावी. स्वच्छता शपथ, रॅली, स्वच्छता अभियान, भित्तीचित्रे आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती करावी.
विशेष स्वच्छता मोहीम – दररोज सकाळी विशेष स्वच्छता मोहीम राबवून नाले, गटारे, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता करावी.
प्लास्टिक निर्मूलन – एकेरी वापराच्या प्लास्टिकविरोधात विशेष मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी.
नागरिकांचा सहभाग – नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या सहभागातून स्वच्छता अभियान अधिक प्रभावी करावे.
दैनंदिन आढावा व अहवाल – महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांनी दररोज स्वच्छता कामांचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा. सर्व कामांचे छायाचित्रांसह दस्तऐवजीकरण करून दररोज सविस्तर प्रगती अहवाल संबंधित कार्यालयाकडे सादर करावा.
***


