परभणी, दि. १८ (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ विद्यार्थी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयाचे अधीक्षक बी. एन. स्वामी यांनी केले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत शहरातील श्री राजे शिव छत्रपती मित्र मंडळाच्या प्रांगणात जनजागृती कार्यक्रम गुरुवारी (दि.१७) घेण्यात आला. यावेळी श्री. स्वामी यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांसाठीच्या भारत सरकार शिष्यवृत्ती, आंतरराज्य व परराज्य शिष्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, शासकीय वसतिगृह व निवासी शाळा योजना, तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना, मिनी ट्रॅक्टर योजना आणि विविध महामंडळांच्या कर्ज योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलनावर गणेशोत्सवातील देखावे सादर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाचे पत्र मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांना यावेळी देण्यात आले.
कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष श्री. गायकवाड, श्री. चोपडे, वरिष्ठ संपादक मंदार कुलकर्णी व पांडुरंग अंभुरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. धोंगडे यांनी केले, तर सूत्रसंचालन मंदार कुलकर्णी यांनी केले.


