परभणी, (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जाती/नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही, अशा तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहाऐवजी थेट स्वाधार योजनेचा अर्ज करता येतो, अशी माहिती सहाय्यक आयुक्त राजु एडके यांनी दिली आहे.
परभणी जिल्ह्यातील पालम, सोनपेठ, पाथरी आणि जिंतूर या तालुक्यांमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही. तसेच गंगाखेड तालुक्यात केवळ मुलींसाठी शासकीय वसतिगृह उपलब्ध आहे. त्यामुळे या चारही तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी, तसेच गंगाखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी (मुलांनी) शासकीय वसतिगृहाऐवजी थेट भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज करणे आवश्यक आहे.
दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी नजरचुकीने अन्य तालुक्यांतील शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश अर्ज सादर केले असल्याचे समाज कल्याण कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या तालुक्यात शासकीय वसतिगृह उपलब्ध नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना त्या वसतिगृहात तांत्रिकदृष्ट्या प्रवेश देणे शक्य होणार नाही.
त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी ज्या शासकीय वसतिगृहाचा प्रवेश अर्ज भरला आहे, त्या वसतिगृहाच्या गृहपालांशी २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत संपर्क साधून अर्ज रद्द करण्यासाठी लेखी अर्ज सादर करावा. अर्जासोबत ऑनलाइन भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रत, आधार कार्डची प्रत आणि शैक्षणिक संस्थेचे मूळ बोनाफाईड प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
अर्ज रद्द झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत स्वाधार योजनेचा अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत आवश्यक कार्यवाही करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त राजु एडके यांनी केले आहे.
*-*-*-*-*


