परभणी,(प्रतिनिधी) भटके व विमुक्त जातीतील नागरिकांनी शासकीय योजना व प्रमाणपत्रांपासून वंचित राहू नये, त्यांनी शासनाच्या विविध सेवा-सुविधांचा लाभ अवश्य घ्यावा. मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथा रोखण्यासाठी समाजानेही पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

महसूल विभाग, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, भटके विमुक्त विकास परिषद, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने “भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान” अंतर्गत उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय, परभणी यांच्यावतीने भटके व विमुक्त जातीतील नागरिकांना विविध शासकीय सेवा, ओळखपत्रे, प्रमाणपत्रे तसेच शासकीय योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज परभणी येथील दर्गा रोड परिसरातील प्राथमिक / माध्यमिक आश्रम शाळेत ‘भटके व विमुक्त जाती हक्क व प्रमाणपत्र शिबिर’ संपन्न झाले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण होते. यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, समाज कल्याण अधिकारी रामेश्वर मुंढे, भटकी व विमुक्त विकास परिषदेचे अशासकीय सदस्य हनुमान कच्छवे व श्री. सोनवणे, नायब तहसीलदार राजकुमार राठोड, आश्रमशाळा अध्यक्ष राजू जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
शिबिरामध्ये भटके व विमुक्त जातीतील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा व सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये जात प्रमाणपत्र वाटप, शिधापत्रिका वाटप, संजय गांधी निराधार योजना, आधार कार्ड, आरोग्य तपासणी यासह सुमारे 20 शासकीय योजना व सेवांचे लाभ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले की, भटके व विमुक्त जातीतील नागरिकांना रहिवासी पुराव्याअभावी शासकीय प्रमाणपत्रे व योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासन सकारात्मक असून स्थानिक चौकशीच्या आधारे आवश्यक प्रमाणपत्रे देण्याबाबत कार्यवाही करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. पात्र नागरिकांनी उपलब्ध असलेल्या शासकीय सेवा व योजनांचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच समाजातील नागरिकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देतानाच बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
प्रस्तावना उपविभागीय अधिकारी श्री. भोसले यांनी केली. शिबिराच्या आयोजनामागील उद्देश व उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध शासकीय सेवांची माहिती यावेळी देण्यात आली. आभार प्रदर्शन तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप बडगुजर यांनी केले.
शिबिरास भटके व विमुक्त समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****


