परभणी (प्रतिनिधी), : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाने निवडणूक तयारीला वेग दिला आहे. निवडणुकीचे कामकाज वेळेत व सुरळीत पार पाडण्यासाठी विविध कक्ष स्थापन करून जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संबंधित नोडल अधिका-यांना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या समितीचे नोडल अधिकारी व त्यांचे अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांची आढावा बैठक घेऊन सूचना देण्यात आली. यावेळी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, नोडल अधिकारी व त्यांचे अधिनस्त कर्मचारी उपस्थित होते.
निवडणुकीसाठी नामनिर्देशन व मतदार यादी, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, प्रशिक्षण, मतपत्रिका तपासणी व वितरण, स्वीप व मतदार सुविधा, वाहन व वाहतूक व्यवस्था, मतदान कर्मचारी व्यवस्थापन, टपाली मतपत्रिका, आयटी व पोल डे रिपोर्टिंग, स्ट्राँग रूम व मतमोजणी, अवैध दारू वाहतूक प्रतिबंध, निवडणूक खर्च देखरेख, माध्यम नियंत्रण तसेच मतदार मदत व तक्रार निवारण अशा विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना मदत करणे, मतदान केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध ठेवणे, मतदानानंतर मतपेट्या सुरक्षितपणे स्ट्राँग रूममध्ये जमा करणे, तसेच सीसीटीव्ही व सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
निवडणूक खर्चावर देखरेख ठेवून उमेदवार व राजकीय पक्षांच्या खर्चाची नोंद घेणे, माध्यमांमधील निवडणूकविषयक बातम्यांचे संनियंत्रण करणे आणि मतदारांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याची जबाबदारीही संबंधित कक्षांकडे सोपविण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी.
कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
******


