परभणी, (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी-कर्मचारी तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण आज, शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील सभागृहात संपन्न झाले.

यावेळी जिल्हाधिकारी तथा ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध बारकाव्यांबाबत मार्गदर्शन केले. निवडणुकीदरम्यान प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी, निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणादरम्यान उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी मतदान प्रक्रियेविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या, मतदान केंद्रावरील व्यवस्थापन, निवडणूकविषयक कागदपत्रांची हाताळणी, मतदान प्रक्रियेतील नियम व सूचनांचे पालन तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
सदर निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यात एकूण २६ क्षेत्रीय अधिकारी, १०० मतदान केंद्राध्यक्ष आणि ३०० मतदान अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणादरम्यान १४ क्षेत्रीय अधिकारी, १५ मतदान केंद्राध्यक्ष आणि २४ मतदान अधिकारी (१, २ व ३) गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. प्रशिक्षणास अनुपस्थित राहिलेल्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या खुलाशांची छाननी करून नियमानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्यासह तहसीलदार परभणी संदीप राजापुरे, तहसीलदार पूर्णा माधवराव बोथीकर, तहसीलदार गंगाखेड उषाकिरण शृंगारे, तहसीलदार जिंतूर शितल कछवे, तहसीलदार सेलू शिवाजी मगर, तहसीलदार सोनपेठ सुनील कावरखे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक तांत्रिक माहिती व निवडणूकविषयक मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. निवडणुकीचे कामकाज विहित नियमांनुसार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधितांनी सक्रिय सहभाग घेऊन आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
***


