अभाविपच्या ‘युगंधरा – जिल्हा युवती संमेलनाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणी,(प्रतिनिधी) : युवतींनी स्वतःचे सामर्थ्य ओळखून विकसित भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले.

युवतींमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, त्यांना स्वावलंबनाची दिशा देणे आणि समाज व राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सक्रिय सहभागासाठी प्रेरित करणे, या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘युगंधरा – जिल्हा युवती संमेलन’ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील मुख्य सभागृहात उत्साहात संपन्न झाले. तेव्हा त्या बोलत होत्या.

‘नव्या युगाची नवी दिशा’ या संकल्पनेवर आधारित संमेलनात युवतींचे नेतृत्व, महिला सुरक्षा, कृषी क्षेत्रातील महिलांचे योगदान, महिला कायदे, भारतीय संस्कृती आणि युवतींच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
संमेलनाच्या उद्घाटन सत्रात लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, अभाविप देवगिरी प्रदेश संघटनमंत्री सिद्धेश्वर लटपटे, परभणी महानगर मंत्री कु. गायत्री लाड आणि युवती संमेलन प्रमुख कु. समीक्षा सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी युवतींनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून ‘नक्की मी करू शकते!’ हा आत्मविश्वास बाळगावा, असे आवाहन केले. युवतींनी केवळ नोकरीच्या संधी शोधण्यापुरते मर्यादित न राहता स्टार्टअप, विज्ञान, संशोधन, पर्यटन, कृषी आणि इतर विविध क्षेत्रांत स्वतःच्या आवडीनुसार संधी निर्माण कराव्यात. स्वतःमधील सामर्थ्य ओळखून त्याचा समाजाच्या प्रगतीसाठी उपयोग केल्यास विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यामध्ये युवती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी सांगितले.
परंपरा आणि आधुनिकता यांचा योग्य समन्वय साधत भारतीय संस्कृती, संस्कार आणि आरोग्यदायी जीवनशैली जपण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. मुलगा आणि मुलगी यांना समान संधी व समान सन्मान मिळाला पाहिजे. युवतींनी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात, नवीन गोष्टी शिकाव्यात आणि सामाजिक प्रश्नांवर संवेदनशीलतेने पुढाकार घ्यावा. पाणी बचत, पर्यावरण संवर्धन आणि Reduce, Reuse, Recycle यांसारख्या कृतींतूनही समाजात सकारात्मक परिवर्तन घडवता येते, असा संदेश त्यांनी दिला.
अभाविप युवतींच्या नेतृत्व विकासाचे प्रभावी माध्यम – सिद्धेश्वर लटपटे
उद्घाटन सत्रात अभाविप देवगिरी प्रदेश संघटनमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे युवतींना नेतृत्व करण्याची संधी देणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे सांगितले. ‘मिशन साहसी’, ‘रूपमती अभियान’ आणि विविध सेवा कार्यांच्या माध्यमातून देशभरातील लाखो युवती विद्यार्थी परिषदेशी जोडल्या जाऊन सामाजिक कार्यात योगदान देत आहेत. संघटनात्मक कार्यातून युवतींमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. युवतींनी या संधींचा उपयोग करून समाजजीवनात सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
कृषी क्षेत्रातील महिलांचे योगदान आणि महिला कायद्यांवर मार्गदर्शन
संमेलनातील भाषण सत्रात कृषी क्षेत्रातील महिलांचे योगदान या विषयावर डॉ. गोदावरी पवार यांनी मार्गदर्शन केले. शेती आणि कृषीपूरक क्षेत्रांमध्ये महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या ज्ञानाला, कौशल्याला आणि योगदानाला योग्य मान्यता मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महिला कायदे आणि सुरक्षा या विषयावर सुरेखा दराडे यांनी मार्गदर्शन केले. महिलांना उपलब्ध असलेले कायदेशीर संरक्षण, स्वतःच्या हक्कांविषयी जागरूकता आणि अन्यायाच्या प्रसंगी योग्य मार्गाने मदत मिळवण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी कायद्यांची माहिती घेऊन स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहावे, असे त्यांनी सांगितले.
संमेलनाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ‘युवती सक्षमीकरण व सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय कृती आराखडा’ हा विचारार्थ प्रस्ताव. परभणी जिल्ह्यातील युवतींच्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव महानगर मंत्री कु. गायत्री लाड यांनी मांडला. संमेलनात हा प्रस्ताव पारित करण्यात आला.
या प्रस्तावामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी प्रवासाच्या सुविधा, शासकीय मुलींच्या वसतिगृहांची दुरुस्ती व नवीन वसतिगृहांची आवश्यकता, शाळा-महाविद्यालयांतील मुलींसाठी स्वच्छतागृहे, सायबर सुरक्षा जागरूकता, बालविवाह प्रतिबंध, व्यावसायिक शिक्षणाच्या संधी आणि शासकीय योजनांचा प्रभावी लाभ यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
युवतींच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता संबंधित प्रशासनाने ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, हा या प्रस्तावामागील प्रमुख उद्देश आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांतून देशभक्तीचा जागर
संमेलनातील सांस्कृतिक सत्रात गणेश वंदना, ‘तेरा वैभव अमर रहे माँ’ आणि ‘वंदे मातरम्’ यांसारख्या गीतांच्या सादरीकरणातून भारतीय संस्कृती, राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना व्यक्त करण्यात आली. या सादरीकरणांनी उपस्थित विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
युवतींनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय भूमिका बजावावी
संमेलनाच्या समारोप सत्रात अभाविपच्या विभाग विद्यार्थिनी प्रमुख कु. सेजल काळे यांनी उपस्थितांशी संवाद साधत कार्यक्रमाचा समारोप केला. युवतींनी स्वतःचे सामर्थ्य ओळखून शिक्षण, नेतृत्व, सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्मितीच्या विविध क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, हा संमेलनाचा मुख्य संदेश होता.
‘युगंधरा’च्या माध्यमातून युवतींना आत्मविश्वास, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी समाज आणि प्रशासनाने समन्वयाने काम करावे, तसेच युवतींनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून विकसित भारताच्या उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन या संमेलनातून करण्यात आले.


