परभणी (प्रतिनिधी) पाथरी येथील पत्रकार हल्ल्याप्रकरणी केवळ राजकीय दबावापोटी फिर्यादी पत्रकारावरच दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणी परभणीचे अपर पोलीस अधीक्षक यांना परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
परभणीचे अपर पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 7 ऑक्टोबर रोजी पाथ्री येथील पत्रकार किरण नागोराव घुम्बरे यांच्यावर बातमी दिल्याच्या रागातून भाजपचे तालुकाध्यक्ष स्वराज प्रल्हाद घुम्बरे यांनी त्यांच्यावर पाळत ठेऊन हा हल्ला केला. त्या हल्ल्यात श्री किरण घुम्बरे यांना डोके, पाठ,व कमरेत मोठी जखम झाली.त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस स्टेशनला संबंधित भाजप तालुका अध्यक्ष स्वराज घुम्बरे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हाही दाखल झाला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन ते तीन दिवस आरोपी हा फरार होता. परंतु काल त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दुपारी आरोपीस न्यायालयात नेत असतानाच भाजपचे जिल्हाध्यक्ष हे चार-पाच गाड्या सह पाथरी पोलीस स्टेशनला धडकले व त्यांनी फिर्यादी पत्रकार किरण घुम्बरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा राजकीय दबाव टाकला. त्यानंतर पोलिसांनी संरक्षण कायद्यातील आरोपीस कुठलेली मारहाण झाली नसताना व अंगावर साधा व्रण नसताना सुद्धा पत्रकारांने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत झालेल्या गुन्ह्याला काउंटर म्हणून दाखल केलेला आहे .पत्रकार किरण घुम्बरे हे इस्पितळात तीन दिवस उपचार करण्यात आले आहे त्यांना मारहाण झाली आहे व ज्यांनी मारहाण केली त्या भाजप तालुका अध्यक्ष यांच्यावर अंगावर कुठल्याही मारहाणीचा व्रण नसताना त्यांच्याकडून मात्र फिर्यादी पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा राजकीय दबापोटी करण्यात आला असून फिर्यादी पत्रकार किरण घुम्बरे यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा तसेच आपण या प्रकरणी आपण पत्रकारांना न्याय दयावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे रामेश्वर शिंदे, विठ्ठलराव वडकुते, शिवशंकर सोनवणे, मंदार कुलकर्णी बर्दापूरकर, मोईन खान, अरुण रणखांबे, अनिल दाभाडकर, पांडुरंग अंभोरे, लक्ष्मीकांत बनसोडे, संघपाल अडागळे, शरद कुलथे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती


