परभणी,(प्रतिनिधी) : वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानात भर पडावी आणि लेखन कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने परभणी रिडर्स क्लब आणि गणेश वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता गणेश वाचनालय येथे निबंध लेखन व सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावी अशा दोन गटांत विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. निबंध लेखन स्पर्धेसाठी ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम – युवकांचे प्रेरणास्थान’ आणि ‘वाचन संस्कृती – काळाची गरज’ हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. निबंध लेखन व सामान्य ज्ञान या दोन्ही स्पर्धांतील प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये विनामूल्य सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक अनुराज रासकटला (मो. 7798429376) यांनी केले आहे.



