परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने जुलै 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय टंकलेखन प्रमाणपत्र संगणक परीक्षेच्या निकालात राखीव ठेवण्यात आलेल्या राज्यातील 11 परीक्षा केंद्रांवरील उमेदवारांची टंकलेखन कौशल्य पडताळणी परीक्षा 16 ते 19 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातील पाच परीक्षा केंद्रांचा समावेश असून, 40 गुणांची गती उतारा टायपिंग चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी दिली.
जुलै 2026 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल 11 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. मात्र, परीक्षेदरम्यान काही गंभीर त्रुटी आढळल्याने राज्यातील 11 केंद्रांवरील उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. संबंधित उमेदवारांच्या टंकलेखन कौशल्याची पडताळणी करून परीक्षेतील पारदर्शकता राखणे आणि पात्र उमेदवारांना न्याय देणे, हा या चाचणीचा उद्देश आहे.
संबंधित उमेदवारांची कौशल्य पडताळणी परीक्षा त्यांनी जुलैमध्ये परीक्षा दिलेल्या केंद्रावरच घेण्यात येणार आहे. संबंधित केंद्र उपलब्ध नसल्यास जवळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित संस्थेमार्फत परीक्षेच्या चार दिवस आधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रवेशपत्र मिळाल्यानंतर उमेदवारांना परीक्षेसाठी प्रविष्ट करण्याची जबाबदारी संबंधित संस्थाचालकांची राहणार आहे.
परीक्षेतील पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर सर्व संगणकांचे मॅक आयडी घेऊन ते परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर पाठविण्यात येणार आहेत. तसेच परीक्षेसाठी संवेदनशील व विश्वासार्ह तंत्रस्नेही शिक्षकांची नियुक्ती करण्यासह आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, संबंधित उमेदवारांनी प्रवेशपत्र आणि परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती घेण्यासाठी आपल्या परीक्षा केंद्राशी किंवा संस्थेशी संपर्क साधावा. प्रवेशपत्र देण्यास नकार दिल्यास शिक्षण विभागाशी संपर्क साधून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील या पाच केंद्रांवर होणार परीक्षा…
या परीक्षेसाठी कर्मयोगी टाटा ज्युनिअर कॉलेज परभणी, मोहिनी कला महाविद्यालय परभणी, ज्ञानगंगा उच्च माध्यमिक विद्यालय परभणी, शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालय परभणी व आयजीएम पॅरामेडिकल कॉलेज गंगाखेड या केंद्रांचा समावेश आहे.


