परभणी, ( प्रतिनिधी): यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्राचीन जलस्रोत असलेल्या बारवांचे पुनरुज्जीवन महत्त्वपूर्ण ठरू शकते. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या या जलसंवर्धनाच्या अनमोल वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याची गरज असून, बारवांकडे केवळ ऐतिहासिक वास्तू म्हणून नव्हे, तर पाण्याचे महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून पाहिले पाहिजेत. त्यामुळे बारवा या इतिहासासोबतच जलसमृद्धीचा अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन बारव अभ्यासक रोहन काळे यांनी केले.

परभणी येथे आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात दोन दिवशीय आयोजित वारसादूतांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
यावेळी बारव अभ्यासक रोहन काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, नायब तहसीलदार प्रमोद वाकोडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, आयटीआयचे प्राचार्य विकास आडे, मल्हारीकांत देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी, अभ्यासक आणि वारसादूत उपस्थित होते.
ग्रामीण भागातील ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि बारवांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित ही वारसादुतांची दोन दिवशीय महाराष्ट्रातील पहिली कार्यशाळा असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी सांगितले. तसेच दोन दिवस चालणाऱ्या कार्यशाळेमागील पार्श्वभूमी सांगताना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राज्यातील विविध गड-किल्ल्याचे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले असून, जिल्ह्यातील गड-किल्लेप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या उपस्थितांचे अभिनंदन केले. बारवांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ऐतिहासिक व पुरातत्त्वीय परंपरेचा वारसा जनतेपर्यंत पोहोचविणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. बारवांविषयीची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. या संदर्भातील कॉफी टेबल बुकच्या इंग्रजी आवृत्तीचे विमोचन 17 सप्टेंबर रोजी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेतील वारसादूत युवकांना समारोपीय सत्रात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान केले जाणार आहे.
रोहन काळे यांनी महाराष्ट्रातील बारवांच्या समृद्ध इतिहासाची माहिती देताना खान्देश, नाशिक, पुणे आणि सातारा परिसरातील विविध बारवांचा उल्लेख केला. काही बारवांना शेकडो, तर काहींना हजारो पायऱ्या असल्याचे सांगत त्यांनी या वास्तूंचे ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रीय महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्रात सुमारे 80 ते 100 बारवा असल्याचे नमूद करताना परभणी जिल्ह्यातही बारवांचा समृद्ध वारसा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात विशेषत्वाने त्यांनी वालूर येथील बारवेचा आवर्जून उल्लेख करताना या बारवांकडे केवळ ऐतिहासिक वारसा म्हणून न पाहता त्या पाण्याचे समृद्ध स्त्रोत असल्याचे श्री. काळे यांनी वारसादूतांना सांगितले. त्यामुळे या बारवांचे पुनरूज्जीवन करण्याचे त्यांनी आवाहन केले.
बारवा या समृद्ध जलस्त्रोत; व्यापक जनजागृतीची आवश्यकता
पूर्वजांनी जलसंधारणाच्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवून उभारलेल्या बारवांकडे अनेक ठिकाणी दुर्लक्ष करण्यात येत आहे. काही ठिकाणी या ऐतिहासिक वास्तूंचा वापर कचराकुंडीसारखा केला जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्रात गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जागरूकता दिसून येते; मात्र मराठवाड्यात ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी अशाच प्रकारची व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. परभणीतील या कार्यशाळेमुळे त्या दिशेने निश्चितच प्रयत्नांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारवा या समृद्ध जलस्त्रोत असून, त्यांच्या पुनरूज्जीवनाकडे गांर्भीयाने पाहत जपण्याचे आवाहन बारव अभ्यासक श्री. काळे यांनी केले.
राज्यातील विविध भागांतील नागरिक आणि अभ्यासकांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार बारवांचे मॅपिंग करण्यात आल्याची माहितीही काळे यांनी दिली. परभणी जिल्ह्यातील वालूर येथील बारवेचा विशेष उल्लेख करत, या बारवेची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे परभणी जिल्ह्यातील ऐतिहासिक जलवारशाला पर्यटनाच्या नकाशावर अधिक ओळख मिळण्यास मदत होईल.
कार्यशाळेच्या पुढील सत्रात ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन उद्या कार्यशाळेच्या दुस-या दिवशी म्हणजे शुक्रवार दि. 16 रोजी होणार आहे. बारवांचे ऐतिहासिक महत्त्व, त्यांची जलसंधारणातील उपयुक्तता आणि त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक लोकसहभाग याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांनी दोन दिवशीय आयोजित वारसादूतांच्या कार्यशाळेची पार्श्वभूमी प्रास्ताविकातून विशद केली. मल्हारीकांत देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. नितीन बावळे यांनी आभार मानले.
उद्या शुक्रवार (दि.१६) रोजी पर्यटन विभागाचे उपसंचालक विजय जाधव (छत्रपती संभाजीनगर) पुरातत्व विभागाचे उपसंचालक अमोल गोटे (नाशिक) ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. अरविंद सोनटक्के (नांदेड), उद्योजक अभिजीत हिरप (छत्रपती संभाजीनगर) यांची उपस्थिती राहणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गडकिल्ल्यांचे प्रदर्शन
राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या राज्यातील गड किल्ल्यांच्या माहिती व छायाचित्रांचे प्रदर्शन जिल्हाधिकारी लावण्यात आले आहे. हे प्रदर्शन शहरवासियांसाठी दि.16 रोजी खुले असून, नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन पुरातत्व खात्याचे उपसंचालक अमोल गोटे यांनी केले आहे.
*-*-*-*-*-


