वालूर येथे हळद पिकाची पाहणी; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या
परभणी, (प्रतिनिधी) : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री म्हणून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी शिफारस करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
सेलू तालुक्यातील वालूर येथे शेतकरी तजम्मूल अहमद अब्दुल हक अन्सारी यांच्या शेतातील हळद पिकाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी सेलू येथील नगराध्यक्ष मिलिंद सावंत ,
तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, कृषी अधिकारी शेळके आणि मंडळ अधिकारी प्रभावती खाकरे उपस्थित होते.
गतवर्षीच्या पीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नसल्याचे सांगतानाच, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मराठवाड्यात केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक आले होते; मात्र आपल्या भागाची पाहणी झाली नसल्याची खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट आर्थिक मदत जमा करावी, अशी मागणी शेतकरी अन्सारी यांनी यावेळी केली.
पिकांचे नुकसान, सिंचनासाठी पाण्याची अनुपलब्धता आणि प्रलंबित पीक विमा यामुळे शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी अधिक गंभीर झाल्याचे या पाहणीदरम्यान समोर आले असल्याचे श्री. आठवले यांनी सांगितले.

*****


