परभणी,दि(प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत शुक्रवार 16 ऑक्टोबर रोजी परभणी येथील स्त्री रुग्णालयातील डीईआयसी विभागात बालकांसाठी हृदय तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 141 बालकांची टू डी इको तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 28 बालकांना हृदयशस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सारिका बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवशे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रिजवान काजी आणि स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेंद्र वर्मा उपस्थित होते. या शिबिरात प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांनी बालकांची तपासणी केली. बालकांमधील हृदयविकारांचे वेळेत निदान करून आवश्यक उपचारांसाठी त्यांना संदर्भित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
शिबिराच्या यशस्वितेसाठी डीईआयसी विभागातील डॉक्टर व कर्मचारी तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.


