परभणी,(प्रतिनिधी) : मराठी खगोल अभ्यास मंडळ नांदेड व परभणी अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 13 डिसेंबर दरम्यान परभणीत 15वे खगोल अभ्यासकांचे राज्यस्तरीय संमेलन होणार आहे, अशी माहिती मराठी खगोल मंडळाचे सचिव तथा शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर, परभणी अस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, उपाध्यक्ष डॉ. पी.आर. पाटील, सचिव सुधीर सोनुनकर यांनी एका पत्रकार परिषदेतून दिली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात या 15व्या राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांच्या संमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द खगोल अभ्यासक दा.कृ. सोमन यांच्याहस्ते तर समारोप परभणीचे सुपुत्र व आंतराळ शास्त्रज्ञ डॉ. मयुर महाज यांच्या उपस्थितीत होणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रसिध्द खगोल अभ्यासक व भुगोल कोषकार एल.के. कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, असे या तीघा पदाधिकार्यांनी म्हटले.
जिज्ञासू व हौशी खगोल अभ्यासकांच्या कार्यास उर्जितावस्था प्राप्त व्हावी, या उद्देशाने गेल्या चार वर्षांपासून मराठी खगोल अभ्यासक मंडळ नांदेड हे राज्यस्तरीय खगोल संमेलनाचे आयोजन करीत आले आहे. या वर्षी हे संमेलन परभणीच्या कृषि विद्यापीठाच्या विशेष सहकार्याने परभणीत विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात होणार आहे. आंतराळात घडणार्या विविध खगोलीय घटना, आधुनिक तंत्रज्ञानामुळे खगोल अभ्यासकांसोबत जनसामान्यांना सहज अवलोकन करणे शक्य झाले आहेत. विविध खगोलीय घटनांचे सुक्ष्म निरीक्षण, सखोल अभ्यास, अचुक विश्लेषण व माहितीचे अदान-प्रदान, खगोल अवकाश विज्ञान क्षेत्रातील शैक्षणिक व विज्ञान कारकिर्द घडविण्याच्या दृष्टीकोनातून शहरी व ग्रामीण भागातील युवा अभ्यासक व संशोधक विद्यार्थ्यांना दिशादर्शक व्यासपीठ मिळावे या हेतूने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही नमूद केले.
हे तीन दिवशीय अधिवेशन म्हणजे निरीक्षकांकरीता खगोल घटकांची पर्वणीच असणार आहे. तसेच या क्षेत्रातील शास्त्रज्ञ, तज्ञ यांच्या व्याख्यानाची मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. या संमेलनात खगोलीय माहितीचे विश्लेषण कसे करावे? खगोल शास्त्रातील आगामी आव्हाने, संधी यासह थरारक अनुभव या विषयी तपशीलवार चर्चा होणार आहे. तसेच या संमेलनात मिथून राशीतील उल्का वर्षाव पाहण्याची नामी संधी तसेच 100 ते 200 खगोल अभ्यासकांबरोबर भेटीगाठीसह सुसंवादाची संधी उपलब्ध होणार आहे. या राज्यस्तरीय संमेलनाच्या निमित्ताने स्थानिक संयोजन समितीतर्फे भक्कम असे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. औंधकर, डॉ. नाईक, सोनुणकर यांनी दिली.
यावेळी डॉ. विजय नरवाडे, डॉ. श्रीनिवास कार्ले, दत्ता बनसोडे, महेश कांकरिया, सुधीर फाकटकर, सचिन मालेगांवकर, हेमंत मोने, भारत आंदुर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


