परभणी, (प्रतिनिधी): एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात जलसंधारणाची कामे लोकसहभागातून व्यापक प्रमाणावर हाती घ्यावीत. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि प्रत्यक्ष परिणाम दिसतील अशा पद्धतीने कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दुष्काळ निवारण बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. सी. डी. चव्हाण, विभागीय वन अधिकारी सायमा पठाण, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता दे. वि. केंधळे, कृषि उपसंचालक एस.एम. जाधवर, एस. आर. कुंभार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पाझर तलाव, गाव तलाव आणि कोल्हापुरी बंधारे यांच्या निर्मितीवेळची जलसाठवणक्षमता, सध्याची क्षमता, साचलेल्या गाळाचे प्रमाण आणि गाळ काढल्यानंतर वाढणारी क्षमता यांची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच जलसाठ्यांचे पुनर्भरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजनही करावे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करून त्यांना गाळ काढून नेण्यासाठी प्रोत्साहित करावे. दुष्काळी परिस्थितीचे आव्हान स्वीकारून या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.
जलसाठ्यांमधून गाळ काढताना बंधारे व प्रकल्पांच्या भिंतींना धोका निर्माण होणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. लघुपाटबंधारे प्रकल्पांमधील गाळ काढल्यानंतर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास त्यांच्या संरचनेची तपासणी करावी. आवश्यकतेनुसार प्रकल्पांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून सुरक्षिततेची खात्री करावी. जलयुक्त शिवार अभियान २.०, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.०, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, जलशक्ती जनभागीदारी आणि ‘कॅच द रेन’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. संबंधित विभागांनी जिल्हास्तरीय दुष्काळ निवारण कृती आराखडा तयार करून आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले.
पूर्ण झालेल्या कामांचे मॅपिंग झाले असल्यास त्यांचे एमएचयूआयडी क्रमांक सादर करावेत. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ‘जलदर्पण’ संकेतस्थळावर उपलब्ध माहितीची तपासणी केली. मृद व जलसंधारण विभागामार्फत सुमारे तीन हजार जलशोषक खड्डे (जलतारा), विहीर जलपुनर्भरण, संयुक्त बंधारे, सिमेंट नाला बंधारे, कोल्हापुरी बंधारे, नाला खोलीकरण आणि अनगड दगडी बांध यांसारखी कामे नियोजित करण्यात आली आहेत.
व्हीबी-जी रामजी योजनेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल, अशा पद्धतीने जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करावे. जिल्हा आकांक्षित जिल्हा असल्याने संबंधित कामांचे अंदाजपत्रक तयार करून त्यांचा पाठपुरावा करावा. अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी या कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
कृषी विभागाने त्यांची नियोजित कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करावीत. त्यामध्ये शेततळ्यांची कामे, ढाळीचे बांध व बांधबंदिस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत. पोकरा योजनेंतर्गत कृषी विभागाचा नियोजन आराखडा पूर्ण झाल्याचे कृषि विभागाने सांगितले.
वन विभागाने रोपवाटिका, चारा उपलब्धता आणि पाणवठ्यांच्या कामांचे नियोजन करताना उपलब्ध तांत्रिक मनुष्यबळाचा विचार करावा. रोपवाटिकांसाठी आवश्यक पाणी, उन्हाळ्यातील पाणीपुरवठा आणि इतर गरजांचा विचार करून प्रस्ताव सादर करावेत. दुष्काळ निवारणासाठी सोपविलेल्या कामांकडे गांभीर्याने लक्ष न देणाऱ्या विभागांना नोटीस देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
पाणीपुरवठा विभागाच्या पुनर्भरणाच्या काही कामांबाबत प्रशासकीय मंजुरीच्या टप्प्यावर अडचणी निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. ही कामे मार्गी लावण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या विशेष निधीचा वापर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गोदावरीच्या पाण्याचा उपयोग करून जलस्रोत बळकट करा
जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. गोदावरी नदीत उपलब्ध असलेल्या पाण्याचा विविध माध्यमांतून उपयोग करून जिल्ह्यातील जलसाठे भरून घेण्याच्या शक्यता तपासाव्यात. यासाठी उपलब्ध जलसाठे आणि पाणी साठवणुकीच्या संभाव्य ठिकाणांची ओळख करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
तसेच प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात घरबांधणी करताना पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यास प्रोत्साहन द्यावे. जलसंधारणाची कामे केवळ कागदोपत्री न राहता त्यांचे प्रत्यक्ष परिणाम दिसले पाहिजेत. संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने कामे पूर्ण करावीत. दुष्काळ निवारणासाठी हाती घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावरही आढावा घेतला जाणार असल्याने विभागांनी कामांना गती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
*****


