परभणी (प्रतिनिधी) आलापूर-पांढरी समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजसाठी करण्यात येणाऱ्या जमीन अधिग्रहणाविरोधात आलापूर-पांढरी, रहाटी परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. भीमराव हत्तीअंबिरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपविभागीय कार्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली; मात्र या बैठकीतून समाधानकारक तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांची नाराजी कायम राहिली.
समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजसाठी जमीन संपादन करण्याच्या अनुषंगाने अधिसूचना क्रमांक १५(२) प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मौजे आलापूर-पांढरी येथील गट क्रमांक ३९, ४०, ४१ आणि ४९ मधील जमिनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार आहेत. मात्र, या जमिनींच्या मोबदल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये असमाधान असून, योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. जमीन संपादनाच्या प्रक्रियेत योग्य मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी अधिग्रहणाला विरोध दर्शविला. मात्र, बैठकीत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
जमिनी देण्यास स्पष्ट नकार
शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार असलेल्या जमिनींच्या संपादनाबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. योग्य मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय जमीन देणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी वाचविण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याची भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंबिरे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, अजित मगर यांच्यासह संबंधित शेतकरी उपस्थित होते.
समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजसाठी प्रस्तावित जमीन संपादनाचा प्रश्न आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासन काय भूमिका घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


