परभणी (प्रतिनिधी) आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात चायनीज, निकृष्ट दर्जाचे व इतर प्रतिबंधित फटाक्यांची अवैध साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे कडक मोडमध्ये आले आहे. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी आणि तहसीलदारांना विशेष तपासणी मोहीम राबवून दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
ग्राहकांची होणारी फसवणूक आणि सुरक्षिततेला असणारा धोका लक्षात घेऊन ‘ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन’ परभणी यांनी २५ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सादर करून तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेत प्रशासनाने हे आदेश जारी केले आहेत. चायनीज व प्रतिबंधित फटाक्यांमुळे नागरिकांच्या जीवितास, सार्वजनिक सुरक्षिततेला आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
“कष्टाच्या कमाईची फसवणूक थांबवा, ‘पेसो’ मान्यताप्राप्त फटाकेच खरेदी करा”: नितीन सोळंके
या संदर्भात बोलताना ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके म्हणाले “ग्राहक जेव्हा आपल्या कष्टाच्या कमाईने सणासाठी फटाके खरेदी करतो, तेव्हा त्याला त्याच्या पैशांचा पूर्ण आणि योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. आजकाल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर चायनीज आणि निकृष्ट दर्जाचे फटाके दाखल होत आहेत. जेव्हा एखादा ग्राहक हे फटाके आनंदाने घरी घेऊन जातो आणि फोडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते फटाके फुटतच नाहीत आणि ‘फुसके’ निघतात. यामुळे ग्राहकांची उघड फसवणूक होते आणि त्यांचा सणाचा आनंदही हिरवला जातो.”
नितीन सोळंके यांनी पुढे आग्रही मागणी व आवाहन करताना सांगितले: “असे निकृष्ट आणि बनावट फटाके प्रशासनाने बाजारामधून आधीच जप्त करून पूर्णपणे काढून टाकले पाहिजेत. तसेच ग्राहकांनीही फटाके खरेदी करताना विशेष काळजी घेतली पाहिजे; फक्त अधिकृत आणि पेट्रोलियम व विस्फोटक सुरक्षा संघटना द्वारे मंजूरझालेले फटाकेच खरेदी करावेत. यासोबतच फटाके विक्रेत्यांनी आणि दुकानदारांनी ‘पेसो’ने मंजूर केलेल्या वैध फटाक्यांची आणि उत्पादनांची यादी आपल्या दुकानात स्पष्टपणे लावली पाहिजे, जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही.”
जिल्हा प्रशासनाचे प्रमुख निर्देश:
* संयुक्त विशेष तपासणी मोहीम: सर्व फटाके विक्रीची दुकाने, गोदामे, साठवणूक केंद्रे आणि तात्पुरत्या स्टॉल्सची तातडीने तपासणी केली जाईल. पोलीस, अग्निशमन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ‘पेसो’ (PESO) यांच्या समन्वयाने ही संयुक्त कारवाई पार पडेल.
* विस्फोटक नियम, २००८ चे कडक पालन: परवान्यात नमूद मर्यादेपेक्षा जास्त साठा असणे, तात्पुरत्या दुकानांचे नियम व अंतराचे निकष पाळले न जाणे यावर कठोर कायदेशीर कारवाई होईल.
* अवैध साठ्यावर जप्ती व फौजदारी गुन्हे: विनापरवाना, चायनीज किंवा प्रतिबंधित फटाके आढळल्यास तो साठा त्वरित जप्त केला जाईल, आस्थापना बंद केली जाईल आणि संबंधितांवर पोलिसांत फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.
* अग्निसुरक्षा तपासणी: गोदामांमध्ये आणि दुकानांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन मार्ग आणि सुरक्षित विद्युत जोडण्यांची तपासणी केली जाईल.
सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने या सर्व निर्देशांची अंमलबजावणी कोणतीही हयगय न करता तातडीने करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.


