परभणी, (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच नियमित, दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून ‘पालकमंत्री आरोग्यदूत अभियान’ राबविण्यात येणार आहे.

सदर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सेलू येथील साई नाट्यगृहात सेलू व जिंतूर तालुक्यांतील आरोग्य विभागाची संयुक्त आढावा बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली.
या अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांच्या सहभागातून प्रत्येक गावाचा स्वतंत्र आरोग्य कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. गावातील आरोग्यविषयक समस्या, आजारांचे प्रमाण, जोखीम गट आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन निश्चित वेळापत्रकानुसार गावोगावी आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत.
अभियानात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, दुर्धर आजारांचे रुग्ण, गर्भवती व स्तनदा मातांना प्राधान्य देण्यात येणार आहे. माता-बाल आरोग्य, नियमित लसीकरण, रक्तक्षय प्रतिबंध, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी, क्षयरोग व कुष्ठरोग शोधमोहीम तसेच डेंग्यू, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे.
आरोग्यदूत भेटीदरम्यान आवश्यक औषधांचे वितरण, आरोग्य तपासणी, समुपदेशन, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि गरजेनुसार रुग्णांना उच्चस्तरीय आरोग्य संस्थांमध्ये संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच व्हॉट्सॲप, ग्रामपंचायत, शाळा व स्थानिक संवाद माध्यमांतून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील एकही नागरिक आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांना नियमित व दर्जेदार आरोग्य सेवा द्याव्यात. निश्चित कृती आराखड्यानुसार सर्व यंत्रणांनी समन्वयाने अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.
बैठकीस पालकमंत्र्यांचे प्रशासकीय सल्लागार डॉ. राहुल आनेराव, अनिकेत पापुलवाड, सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत, माजी सभापती दिनकर वाघ, शिवाजी कदम,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, उपजिल्हा रुग्णालय सेलूचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, गटविकास अधिकारी उदय जाधव, जिंतूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आबासाहेब जाधव यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी व जिल्हा कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.
***


