सेलू (प्रतिनिधी) भारतीय प्राचीन योगशास्त्र हा भारताने संपूर्ण जगाला दिलेला अनमोल ठेवा आहे. इतर खेळांप्रमाणेच योगासनाचाही क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश झाला असून, मुलांमध्ये योगाची आवड निर्माण करण्यासाठी बालवयापासूनच स्पर्धात्मक योगासन स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांनी केले.
वासुदेव योग यांच्या वतीने दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी वासुदेव योग हॉल, सेलू येथे ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनचे राज्य सरचिटणीस गणेश माळवे होते. यावेळी क्रीडा संयोजक प्रशांत नाईक, क्रीडा संघटक नागेश कान्हेकर आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीचे सचिव देविदास सोन्नेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी आणि इयत्ता पाचवी ते आठवी या वयोगटातील मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध योगासन प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पदके प्रदान करून गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांचा वाढदिवसही यावेळी बाल खेळाडू, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू तसेच लेक्रॉस खेळाडूंच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी आंतरराष्ट्रीय लेक्रॉस भारतीय संघातील खेळाडू अजय चव्हाण, शालेय राष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेत सलग दोन वेळा कांस्यपदक प्राप्त करणारा खेळाडू अपूर्व कुलकर्णी आणि राष्ट्रीय कबड्डीपटू राहुल घांडगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा अंतिम निकाल :
इयत्ता पहिली ते चौथी गटात प्रथम रिया रमेश पौळ, द्वितीय स्वरा रामकिशन पानझाडे, तर तृतीय आर्या गौरव बिहानी यांनी क्रमांक पटकाविला.
इयत्ता पाचवी ते नववी गटात प्रथम ईश्वरी उत्तम डोंबे, द्वितीय स्वानंदी संतोष घोगरे, तर तृतीय स्वरा ज्ञानेश्वर बरसाले यांनी यश संपादन केले.
स्पर्धेचे पंच म्हणून सोमनाथ महाजन, अपूर्व कुलकर्णी, सुष्मिता भरदम, शिल्पा बर्डे, प्रतिभा चव्हाण, अनुजा सुभेदार, श्रुती खंदारे, शीतल खंदारे आणि सलोनी जमदाडे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत नाईक यांनी केले. सूत्रसंचालन नागेश कान्हेकर यांनी, तर आभार प्रदर्शन देविदास सोन्नेकर यांनी केले.


