परभणी, (प्रतिनिधी) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या व्हिजनला बळ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लाडक्या बहिणीं’च्या आर्थिक उत्कर्षाचे स्वप्न प्रत्यक्षात आणत परभणी जिल्ह्यातील ग्रामीण महिला भगिनींनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.
दिवाळीच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी परभणीच्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्कृष्ट स्थानिक उत्पादनांचा खास दिवाळी भेट संच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सप्रेम भेट दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीच्या महिलांच्या या कौशल्याचे आणि उत्पादनांच्या उत्कृष्ट दर्जाचे मनापासून कौतुक केले असून, जिल्ह्यातील महिला उद्योजकांच्या भावी वाटचालीस व दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना ना. मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, “परभणीच्या महिलांमध्ये प्रचंड कौशल्य आहेच, शिवाय मेहनत करण्याची अफाट जिद्द आहे. शासनाने महिला सक्षमीकरणासाठी राबवलेल्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील महिलांना उद्योजकतेची नवी ताकद मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया संकल्पनेंतर्गत या महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ व इतर गृहपयोगी वस्तूंना बाजारात मोठी मागणी व पसंती मिळतेय.”
त्या पुढे म्हणाल्या की, “महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे, उत्कर्षाचे स्वप्न आता परभणीच्या घराघरात साकार होतेय ! स्थानिक महिलांनी तयार केलेल्या या उत्पादनांची थेट मुख्यमंत्र्यांना भेट देऊन ग्रामीण महिला उद्योजिकांच्या कौशल्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केला.”
***


