परभणी (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड गुरुवारी (दि. १९) खाजगी व्यापाऱ्यांमार्फत जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शुभारंभ प्रसंगी पहिल्याच दिवशी कापूस यार्डात ३५ कापसाची वाहने दाखल झाली. या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ९ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
शुभारंभ प्रसंगी टीएमसी मार्केट यार्डात कापूस पिकाचा जाहीर लिलाव करण्यापूर्वी कापूस उत्पादक शेतकरी रामेश्वर बाबर रा. सुरपिंपरी, श्रीनिवास टेकाळे रा. जलालपूर, अविनाश पुके रा. टाकळी कुंभकर्ण, मुंजा धुमाळ रा. सुरपिंपरी, गोविंदराज राजगुरे रा. नांदखेडा, भुजंग कुसळे रा. दैठणा, विठ्ठल जाधव, मंचक लांबाडे रा. परभणी, राहुल देशमुख रा. टाकळी कुंभकर्ण, गणेश देशमुख रा. पेडगाव, नवनाथ झाडे रा. मुरुंबा या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून सत्कार करण्यात आला. तसेच कापूस व्यापारी कमल मानधने, बाळू शेठ शर्मा, सुभाष आंबिलवादे, पुरुषोत्तम झंवर, अजय सरीया, भवानी लिंबांनी, सीसीआयचे केंद्रप्रमुख संजय कोकडे यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण, संचालक विनोद लोहगावकर, रावसाहेब रेंगे, पांडुरंग खिल्लारे, रमेशराव देशमुख, सोपानराव मोरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, कापूस खरेदीदारांनी मार्केट यार्डात आलेल्या कापसाची योग्य प्रतवारी करून जास्तीत जास्त बाजार भाव द्यावा, शेतकरी बांधवांनी चांगला कापूस व खराब कापूस अशी प्रतवारी करून आणावा. बाजार समितीचे संचालक मंडळ हे शेतकऱ्यांच्या हितासाठी तत्परतेने काम करीत असून बाजार समितीस गतवैभव प्राप्त होईल, अशा आशा यावेळी बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी व्यक्त केली.
०००


