ग्रामपंचायत, बँक शाखा व विकास संस्थांमध्ये यादी उपलब्ध
परभणी, (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत एकवेळ समझोता अंतर्गत पात्र ठरलेल्या परभणी जिल्ह्यातील ४ हजार ७५९ पात्र शेतकऱ्यांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ही यादी संबंधित ग्रामपंचायत, बँक शाखा तसेच विकास संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) विकास जगदाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र शासनाने दि. 2 जून २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ राबविण्यात येत आहे. या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहन अशा तीन घटकांचा समावेश आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात कर्जमाफी घटकाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात दि. २४ जुलै, ११ सप्टेंबर, १२ ऑक्टोबर आणि २२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्राप्त याद्यांनुसार एकूण १ लाख ३६ हजार ८०९ शेतकऱ्यांच्या याद्यांची पडताळणी करण्यात आली. त्यापैकी आधार प्रमाणीकरण केलेल्या १ लाख १३ हजार ९७२ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १ हजार ४१ कोटी ७५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकवेळ समझोता (OTS) अंतर्गत पात्र शेतक-यांनी रु. 2 लाखांवरील शेतकऱ्यांच्या हिश्याची रक्कम बँकेत भरल्यानंतर रु.2 लाखाचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. परभणी जिल्हयातील बँकाकडील माहितीचे संगणकीय संस्करण करुन एकूण 4759 पात्र शेतकऱ्यांची यादी आज दि. 20 नोव्हेंबर 2026 रोजी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. एकवेळ समझोता (OTS) अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एक वेळ समझोता अंतर्गत पात्र शेतकऱ्याच्या कर्जखात्यासंदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही अवलंबली जाणार आहे.
एक वेळ समझोता अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी गावपातळीवर ग्रामपंचायत तसेच बँकेच्या शाखेत व विकास संस्थेच्या शाखेमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, बँक कर्जखाते तपशिल, दि.31 मार्च 2026 अखेरच्या थकबाकीची रक्कम, एकवेळ समझोता (OTS) प्रमाणे थकबाकीची रक्कम, एकवेळ समझोता प्रमाणे शेतकऱ्याने भरावयाची रक्कम व शासना मार्फत देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम नमुद आहे.
शेतकऱ्याने प्रसिद्धी यादीतील तपशिल तपासुन त्यांच्या हिश्याची रु.2.00 लाखावरील रक्कम संबंधीत बँकेत भरणा करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखाते एकाच बँकेत आहे, अशा शेतकऱ्यांनी यादीत नमूद केलेली रक्कम संबंधीत बँकेच्या कर्जखात्यात भरणा करावी.
ज्या शेतक-यांची एकापेक्षा जास्त कर्जखाती आहेत अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्शाची रक्कम त्यांच्या कोणत्याही कर्ज खात्यात भरण्याची सुविधा आहे. परंतु शेतकऱ्यांने एका खात्यामध्ये यादीतील रकाना क्र. 10 मध्ये नमुद पेक्षा जास्त रक्कम भरु नये. (एकापेक्षा जास्त कर्जखाती असलेल्या शेतकऱ्याने त्याच्या हिश्श्याची रक्कम भरत असताना एक वेळ समझोता योजने प्रमाणे बँकेस देय असलेल्या रकमेपेक्षा जास्तची रक्कम त्या खात्यात भरु नये) शेतकऱ्यांनी योग्य ती माहिती घेऊन बँकेत रक्कम जमा करावी. बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करावे.
बँकेमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रु.2 लाखावरील रक्कम संबंधीत बँकेत भरल्यानंतर संबंधीत बँकेने याबाबतची माहिती पोर्टलवर अद्ययावत करावी.
शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जाच्या रु. 2.00 लाखावरील कर्जाची रक्कम भरावयाची अंतिम मुदत दि. 31 मार्च 2027 पर्यंत राहिल.
यादीत नमूद असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम बँकेत भरणा केल्याची अद्ययावत माहिती दर शुक्रवारी बँकेमार्फत पोर्टलवर अपलोड केली जाईल. बँकेने माहिती पोर्टलवर अपलोड केल्याचे शेतकऱ्यास कळवायचे आहे.
महा आयटी मार्फत अशा प्रकरणी शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम यादी प्रमाणे भरणा केल्याची खात्रो पोर्टलवर करण्यात येईल. यादीत नमूद केलेली रु.2.00 लाखापेक्षा वरील रक्कम शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेत भरली असल्यास अशा शेतकऱ्यांना थकबाकीचे अद्ययावतीकरण झाल्याच्या तीन दिवसानंतर संबंधित शेतकऱ्यासाठी आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.
योजनेच्या निकषानुसार अशा शेतकऱ्यांसाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक असल्याने ज्या शेतक-यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठीच आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.
ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टंक नोंदणी केलेली आहे व आधार प्रमाणीकरण केलेले आहे अशा शेतकऱ्यांना निकषांनुसार व संबंधीत बँकेत त्यांच्या हिश्श्याची भरलेली रक्कम भरल्यानंतर रु.2.00 लाखाचा लाभ हस्तांतरीत करण्यात येईल. शासनाने रु.2.00 लाखाची रक्कम वर्ग केल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमुक्ती होणार आहे.
सदरची एकवेळ समझोता योजना अंतर्गत यादी ही केवळ एकच यादी नसून बँकांकडे आलेल्या माहितीचे संगणकीय संस्करण करण्यात येईल व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या यापुढेही प्रसिद्ध करण्यांत येतील.
योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये मयत झालेल्या तसेच वयस्कर व बोटांच्या उशाची नोंद होत नसल्याबाबत लाभार्थ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ देण्याचे अनुषंगाने दि.19 ऑगस्ट 2026 रोजीची मानक कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आलेली आहे, असे प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविण्यात आले आहे.
*-*-*-*-*


