परभणी (प्रतिनिधी) शहरातील अंतर्गत व मुख्य रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक, रस्त्यांवरील खड्डे, बांधकाम साहित्यामुळे निर्माण होणारे अडथळे तसेच वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी अखिल भारतीय नौजवान सभा (AIYF), महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
परभणी शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, याचा फटका सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, पालक, शाळेच्या वाहनचालकांसह व्यापारी व शेतकऱ्यांनाही बसत आहे. शहरातील रस्त्यांवर अनधिकृत अतिक्रमण करून पार्किंगसाठी जागा अडविणे, बांधकाम साहित्य टाकणे, खड्डे व वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
निवेदनात केवळ दंडवसुलीवर भर न देता रस्ते मोकळे करणे, वाहतूक कोंडी कमी करणे, अतिक्रमण हटविणे, आवश्यक ठिकाणी वाहतूक सिग्नल, नो-पार्किंग फलक, झेब्रा क्रॉसिंग व दिशादर्शक फलक बसविणे, वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे तसेच अल्पकालीन व दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच वाहतूक नियमांचे पालन नागरिकांकडून अपेक्षित असताना प्रशासनानेही स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. दंडवसुलीच्या नावाखाली आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना लक्ष्य करण्याऐवजी सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था निर्माण करावी, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिक, पालक, शालेय वाहनचालक व सामाजिक संघटनांच्या सहभागातून लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सय्यद अझहर, संदीप सोळंके, बाबा खान, गंगाधर यादव, महिप रेवणवार, सय्यद रफिउद्दीन, वाहिद खान, सतीश मस्के, सुदर रेंगे, शेख मोहसीन, शेख असद, रिझवान पटेल, प्रसाद गोरे आदींनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.


