परभणी, (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मार्फत स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘आधार सेवा केंद्राचे’ आज जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
परभणी शहरातील मुरली हाईटस, ज्ञानेश्वर नगर रोड, लोकमान्य नगर येथे हे केंद्र कार्यान्वित झाले आहे. आता आधार करिता येणाऱ्या अडचणी किवा तक्रारी निवारणासाठी मुबई प्रादेशिक कार्यालयास जाण्याची गरज नाही.
या उद्घाटन सोहळ्यास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, युआयडीएआयचे सहाय्यक व्यवस्थापक कुलदीप सिंग गहलोद, आधार सेवा केंद्र परभणीचे केंद्र व्यवस्थापक दौलत वाघमोडे, बीएलएस इंटरनॅशनलचे निलेश शहाणे , हभप अच्च्युत महाराज दस्तापुरकर, ऑपरेशन व्यवस्थापक नरेंद्र आडगावकर व केंद्र कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, परभणी जिल्ह्यात युआयडीएआय मार्फत आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून, यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आधार नोंदणी तसेच आधारमधील आवश्यक अद्ययावत बदल करण्याच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी ही केंद्र आठवड्यातील सातही दिवस सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत कार्यरत राहणार आहेत.
विशेषतः ५ ते १७ वर्षे वयोगटातील बालकांचे Mandatory Biometric Update (MBU) करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढत्या वयानुसार बालकांच्या बायोमेट्रिक माहितीमध्ये बदल होत असल्याने हाताच्या बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन आणि छायाचित्र अद्ययावत करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास आधार आधारित शासकीय योजना, शिष्यवृत्ती, शैक्षणिक प्रवेश, बँकिंग व इतर सेवांचा लाभ घेताना संभाव्य अडचणी टाळण्यास मदत होईल.
या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि विशेष शिबिरांच्या माध्यमातून एमबीयु मोहीम राबविण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचे बायोमेट्रिक अद्ययावतीकरण वेळेत करून घ्यावे. तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या आधार सेवा केंद्र सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
*केंद्राचे प्रमुख वैशिष्ट्ये आणि उपलब्ध सेवा*
*एकाच छताखाली सर्व सेवा* – नवीन आधार नोंदणी (बाल आधार व प्रौढ), नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक व ई-मेल अद्ययावत करणे, बायोमेट्रिक अपडेट (फोटो, बोटांचे ठसे, बुबुळे), तसेच ओळखीचा व पत्त्याचा पुरावा (POI/POA) अद्ययावत करण्याची सोय येथे उपलब्ध आहे.
*सुटसुटीत आणि पारदर्शक कार्यप्रणाली* – नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी येथे टोकन प्रणाली, हेल्प डेस्क, कागदपत्र पडताळणी (Verifier), शुल्क भरणा काउंटर आणि ECMP ऑपरेटर अशी शिस्तबद्ध चार-टप्प्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
*विशेष व समावेशक उपक्रम* – ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी येथे विशेष बसण्याची व मार्गदर्शनाची सोय आहे. तसेच दिव्यांगांचे आधार काढणे, निलंबित किंवा बंद पडलेले आधार (White List प्रक्रियेद्वारे) पुन्हा सुरू करणे आणि शाळा व शासकीय कार्यक्रमांमध्ये विशेष कॅम्प घेणे अशी विशेष कार्ये या केंद्रामार्फत केली जातील.
*ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा* – नागरिकांना रांगेत न थांबता सेवा घेता यावी यासाठी [https://appointments.uidai.gov.in](https://appointments.uidai.gov.in) या संकेतस्थळावरून विनामूल्य ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
****


