छत्रपती संभाजीनगर, : ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत छत्रपती संभाजीनगर येथे शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर होणार आहे. या शिबिरात महामंडळाच्या विविध कर्ज व्याज परतावा योजनांची माहिती देण्यासह पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्रत्यक्ष स्वीकारण्यात येणार आहेत.
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना’ आणि ‘गट कर्ज व्याज परतावा योजना’ या योजनांची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, तसेच अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
‘वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने’अंतर्गत बँकेकडून घेतलेल्या कर्जावर नियमित परतफेड केल्यास बँकेच्या व्याजदराच्या किंवा १२ टक्के यांपैकी कमी असलेल्या दराने, कमाल सात वर्षांच्या कालावधीसाठी व्याज परतावा देण्यात येणार आहे. पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी कमाल १.७० लाख रुपये, दहा लाख रुपयांच्या कर्जासाठी कमाल तीन लाख रुपये आणि पंधरा लाख रुपयांच्या कर्जासाठी कमाल ४.५० लाख रुपयांपर्यंत व्याज परताव्याची तरतूद आहे.
‘गट कर्ज व्याज परतावा योजने’अंतर्गत दोन किंवा अधिक व्यक्तींच्या गटाने राष्ट्रीयीकृत, खासगी अथवा सहकारी बँकेकडून घेतलेल्या कमाल ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर नियमित परतफेड केल्यास व्याज परतावा देण्यात येणार आहे. तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांच्या गटाला कमाल १५ लाख रुपयांपर्यंत व्याज परतावा मिळण्याची तरतूद आहे.
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आणि ब्राह्मण समाजातील असावा. वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे असून, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. महिलांसाठी ३० टक्के, तर दिव्यांगांसाठी तीन टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन अथवा ऑफलाइन स्वरूपाची असून, अर्जदाराने प्रथम महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्या लाभार्थ्यांनी शिबिरापूर्वी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे, त्यांनी शिबिरात अर्ज सादर करावेत. शिबिरात योजनांची सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. महामंडळाचे मुख्यालय पुणे येथे असून, अध्यक्षपदी कॅप्टन श्री. आशीष दामले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्री दर्जा प्रदान करण्यात आला आहे. महामंडळाच्या योजनांची अधिक माहिती व ऑनलाइन नोंदणीसाठी https://pavm.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


