शेतकरी कामगार पक्षाचे जोरदार आंदोलन
परभणी,(प्रतिनिधी) शहरातील दर्गा रस्त्यावरील हाजी हामीद कॉलनीत सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नवीन डीपी बसवून वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी शेतकारी कामगार पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्यावतीने गुरुवारी (दि.10) जोरदार आंदोलन करण्यात आले.
दर्गाह रस्त्यावरील पारवा गेटजवळील हाजी हमीद कॉलीनीत रहिवाशांचे वीजेअभावी प्रचंड बेहाल होत आहेत. चार-चार दिवस वीज पुरवठा खंडीत राहत असून या भागातील पोलचे अंतर तसेच लोंबळणार्या तारांमुळे विलक्षण स्थिती निर्माण झाली आहे. आधीच या भागातील नागरीक मूलभूत सोयी-सुविधांअभावी हैराण असतांना महावितरण कंपनीच्या या दररोजच्या त्रासामुळे नागरीकांचे जीवन असह्य झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई किर्तीकुमार बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष रहीमोद्दीन अन्सारी, मोईज खान, असलम भाई अन्सारी, शेख मुशरफ, शेख बुर्हाण, मुसा खान, सय्यद अय्यान व शेख नसीर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी अधिक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर ठाण मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.