परभणी (प्रतिनिधी) शहर महानगरपालिके मार्फत धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र येथे 80 लक्ष लिटर क्षमतेचे बैठा जलकुंभ (संप) बांधण्यात आलेला आहे. सदर बैठा जलकुंभ हा अमृत योजने अंतर्गत बांधण्यात आला आहे.
परभणी शहराला येलदरी धरणातून पाणीपुरवठा होत असून येलदरी धरणातून येणारे पाणी धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र येथे शुद्धीकरण करण्यात येत आहे. येलदरी धरणाची उंची धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र पेक्षा 86 मीटर जास्त असल्याने पाण्याचे फ्लो (प्रवाह) मोठा असतो यामुळे जलशुद्धीकरण केंद्र धर्मापुरी येथील विदयुत पुरवठा खंडीत झाल्यास तो पुन्हा सुरळीत होईपर्यंत पाणी वाया जात आहे. सदर वाया जाणा-या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व त्यावर योग्य उपाय व पाण्याची बचत करण्यासाठी परभणी महानगरपालिकेने धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र येथे 80 लक्ष लिटर क्षमतेचा बैठा जलकुंभाचे बांधकाम अमृत योजने अंतर्गत केले आहे.
यामुळे परभणी महानगरपालिकेची विद्युत बिलामध्ये बचत होईल व जलसंपदा विभागामार्फत म.न.पा.ला आकारल्या जाणा-या पाण्याच्या बिलामध्ये काही प्रमाणात बचत होईल. अशा सर्व उपाय योजनांमुळे विद्युत बिल, जलसंपदा विभागामार्फत म.न.पा.ला. आकारल्या जाणा-या पाण्याच्या बिलामध्ये व देखभाल दुरुस्ती मध्ये दरमहा रूपये 8 ते 10 लाख बचतीचा अंदाज आहे. तसेच दररोज 25 ते 30 लक्ष लीटर वाया जाणारे पाण्याची सुद्धा बचत होईल. सदर जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून पाणीपुरवठा विभागामार्फत दि. 27 रविवारी त्याची अंतिम चाचणी घेण्यात आली आहे व त्याचा वापर चालू करण्यात आला आहे.



