प्रतिनिधी) (प्रतिनिधी) : येथील काद्राबाद प्लॉट भागातील एका नागरीकाविरोधात मतदान करतेवेळीचा बॅलेट युनिटचा फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल केल्याबद्दल येथील नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, जिंतूर रस्त्यावरील शारदा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर बुधवारी सकाळी शेख सुलेमान यांनी मतदान केले. स्वतः मतदान करतांना बॅलेट युनिटवरील अनुक्रमांक 14 वरील पिपाणी या निवडणूक निशाणीवर बटण दाबून त्या चिन्हावर मतदान करते वेळीचा फोटो काढला. तो स्वतःच्या मोबाईलवरुन फेसबुक अकाऊंटवरुन व्हायरल केला. त्याद्वारे मतदानाच्या प्रक्रियेचा व गोपनियतेचा भंग केला.
या केंद्रावरील अधिकारी तथा जिल्हा परिषद शाखा अभियंता प्रविण देवशेटवार यांनी या संदर्भात नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. नानलपेठ पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देवकर हे या प्रकरणात तपास करीत आहेत.


