परभणी,(प्रतिनिधी) : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा एका माथेफिरुने मंगळवारी (दि.10) सायंकाळी अवमान करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेला शांतता राखण्याची आवाहन केले आहे.
या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणावर नागरीक जमा झाले. तसेच काहींनी रास्तारोको तर काहींनी नंदीग्राम एक्सप्रेस रोकुन निषेध व्यक्त केला . परंतु, सुज्ञ पदाधिकारी व नागरीकांनी व पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेवून या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थिती तात्काळ नियंत्रणात आणली.
पोलिसांनी त्या माथेफिरुची कसून चौकशी सुरु केली होती. त्या दरम्यान शहरात काहीशा अफवा पसरल्या. पाठोपाठ व्यापार्यांनी तात्काळ आपआपले व्यवहार बंद केले.
दरम्यान, संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस यंत्रणेने केले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी जनतेसाठी संदेश देत शांतता राखण्याच्या आवाहन केले आहे.


